पुणे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या रुंदीकरणास गती देण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश.
विमाननगर, सिम्बायोसिस रोड, नागपूर चाळ ते ५०९ चौक तसेच नॉर्थ मेन रोड परिसरातील कामांची आयुक्तांकडून पाहणी
पुणे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करण्यासाठी तसेच पुणे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांची क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने मा. पुणे महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी आज विविध रस्त्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना रस्त्यांचे रुंदीकरण, अतिक्रमण निर्मूलन, भूसंपादन आणि सुरू असलेली विकासकामे वेळेत पूर्ण करण्याबाबत आवश्यक निर्देश दिले.
विमाननगर परिसरातील व्हीव्हीआयपी रोड, सिम्बायोसिस रोड आणि शुभ चौक येथील हातगाड्या, फेरीवाले तसेच साइड मार्जिनमधील अतिक्रमणांची आयुक्तांनी पाहणी केली. या परिसरातील अतिक्रमणांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी निश्चित पॉइंट ठरवून नियमितपणे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
रामवाडी भुयारी मार्ग ते पुणे विमानतळाकडे जाणाऱ्या सिम्बायोसिस रोडची पाहणी करण्यात आली. मंजूर विकास आराखड्यानुसार (डीपी) या रस्त्याचे ३० मीटर रुंदीकरण करण्याबाबत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
नागपूर चाळ, जेल रोड पोलीस चौकी ते ५०९ चौक आणि विकफिल्ड चौक मार्गे पुणे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाची पाहणी करण्यात आली. तसेच ५०९ चौक येथून हवाई दलाच्या हद्दीतून धानोरी मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत चर्चा करण्यात आली. या कामाला गती देण्यासाठी एअर फोर्स स्टेशन, लोहगाव येथील अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
नॉर्थ मेन रोड येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करून हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
पुणे विमानतळ परिसरातील एरो मॉलजवळ कलम २०५ अंतर्गत आखण्यात आलेल्या ३० मीटर रुंदीच्या रस्त्याच्या भूसंपादनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले.
पुणे विमानतळाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, अतिक्रमण निर्मूलन आणि प्रलंबित विकासकामांना गती देऊन शहरातील वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासनाने समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश या पाहणीदरम्यान देण्यात आले.
या पाहणीवेळी मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. प्रजित नायर, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. ओमप्रकाश दिवटे, मा. अतिरिक्त पोलीस आयुक्त, श्री. मनोज पाटील, मा. उपायुक्त श्री. तुषार बाबर, मा. मुख्य अभियंता (पथ विभाग) श्री. राजेश बनकर, मा. उपायुक्त, अतिक्रमण विभाग श्री. सोमनाथ बनकर, मा. महापालिका सहाय्यक आयुक्त श्री. संजय पोळ, तसेच पथ विभाग, बांधकाम विकास विभाग आणि नगर रोड-वाघोली क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.