लोणावळा पोलिसांचे स्पष्टीकरण: बनावट सही प्रकरणातील आरोपी इक्बाल जाफरीच्या अटकेबाबत सोशल मीडियावरील दाव्यांमध्ये तथ्य नसल्याचा खुलासा.

लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 34/2026 मधील आरोपी इक्बाल हुसेन मुमताज अली जाफरी याच्या अटकेबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या बातम्यांवर लोणावळा शहर पोलिसांनी अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. पोलिसांनी सांगितले की, 16 फेब्रुवारी 2026 रोजी बनावट दस्तऐवज व खोटी सही केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान सुरुवातीला आरोपीचे नाव ‘शेखर पटेल’ असल्याचे सांगण्यात आले होते.
पुढील तपासात ‘शेखर पटेल’ हे खोटे नाव असल्याचे उघड झाले आणि प्रत्यक्ष आरोपी इक्बाल हुसेन मुमताज अली जाफरी असल्याचे समोर आले. त्यानंतर 20 मार्च 2026 रोजी त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले. गुन्ह्यातील सहभाग व सबळ पुरावे आढळल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 21 मार्च रोजी न्यायालयात हजर केल्यावर आरोपीने पोलिसांविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे न्यायालयासमोर स्पष्टपणे सांगितले.
तपासात असेही निष्पन्न झाले की, या प्रकरणातील आरोपी क्रमांक 10 उत्तम दादू चौरे यानेच खऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी ‘शेखर पटेल’ हे खोटे नाव सांगितले होते. त्यामुळे त्यालाही या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले. या प्रकरणात 11 मे 2026 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, सध्या हा खटला न्यायप्रविष्ट आहे, असे लोणावळा शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.