जुन्नर तालुक्यात घरफोड्या करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; चौघांना अटक, ३६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त!
ओतूर पोलिसांची मोठी कारवाई; चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस, चोरीतील ७० तोळे सोने, रोकड आणि कार जप्त; आणखी एक आरोपी अटकेत
पुणे, दि. २७ ऑक्टोबर २०२६
जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी बंद घरांना लक्ष्य करून घरफोड्या करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चौघांना अटक केली असून, त्यांच्याकडून चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून सुमारे ७० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ३६ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ओतूर पोलीस ठाण्यात ५ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३०५(अ) अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. नारायणगाव आणि ओतूर परिसरात अशाच घटना घडल्याने पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.
तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये संशयित कार दिसून आली. ओतूरपासून नाशिकपर्यंत सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. नाशिकमधील इंदिरानगर आणि वडाळा परिसरात शोध घेतल्यानंतर संशयित कार आढळली. कारमालकाची चौकशी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी नाशिक परिसरात सापळा रचून वसीम मुनीर पठाण (२९, रा. पिंपळगाव नजीक, लासलगाव, ता. निफाड), अदनान युनूस पठाण (२६, सध्या रा. वडाळा, इंदिरानगर, नाशिक) आणि सोनू ऊर्फ मोहम्मद शरीफ रसूल शेख (४०, रा. पिंपळगाव नजीक, लासलगाव) या तिघांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून आणखी गुन्ह्यांची माहिती समोर आली.
आरोपींनी ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार घरफोड्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली. तसेच चांदीचे दागिने विकत घेणारा सागर अशोक शिंदे (३०, रा. विंचूर, ता. निफाड, नाशिक) यालाही अटक करण्यात आली आहे.
या टोळीने गुन्हा करताना पकडले जाऊ नये म्हणून वारंवार कार बदलल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या वाहनांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीचा आधार घेतला.
या प्रकरणात ओतूर पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक २६५/२०२६, २१८/२०२६, २१७/२०२६ आणि नारायणगाव पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर क्रमांक २०३/२०२६ अशा चार गुन्ह्यांची उकल झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, पुढील तपास ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बानगिरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलीस ठाण्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
जुन्नर तालुक्यातील घरफोड्यांच्या घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, या टोळीचा आणखी कोणत्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.