मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘मिसिंग लिंक’ मार्गावर वाहतुकीचे नवे नियम लागू होणार.
कारसाठी १००, तर प्रवासी बससाठी ८० किमी प्रतितास वेगमर्यादा; अवजड व धोकादायक मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी
मुंबई-पुणे, दि. २७ ऑक्टोबर २०२६
: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ (कनेक्टिंग लिंक) मार्गावर सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी आणि संभाव्य अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ही नियमावली १ नोव्हेंबर २०२६ पासून लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी जारी केलेल्या वाहतूक अधिसूचनेनुसार, या मार्गावर वाहनांच्या प्रकारानुसार वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
कारसाठी १०० किमी वेगमर्यादा : खासगी कार आणि इतर हलक्या मोटार वाहनांना कमाल ताशी १०० किलोमीटर वेगाने प्रवास करण्याची परवानगी असेल. तर प्रवासी बस आणि इतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी ताशी ८० किलोमीटर वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
अवजड वाहनांना प्रवेशबंदी : मिसिंग लिंक मार्गावर सर्व प्रकारच्या मालवाहू अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेशबंदी असणार आहे. तसेच ज्वलनशील, स्फोटक किंवा इतर धोकादायक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही या मार्गावरून जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
अशा वाहनांनी जुन्या द्रुतगती महामार्गाचा (Old Expressway Route) वापर करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांनी केले आहे.
मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी नवीन वाहतूक नियमांचे पालन करावे, वेगमर्यादेचे उल्लंघन टाळावे आणि सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.