नवी दिल्ली : उत्तर भारतातील हवामानात पुढील दोन ते तीन दिवसांत मोठा बदल होण्याची शक्यता असून, पावसामुळे थंडी आणखी वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवला आहे. आयएमडीच्या माहितीनुसार, पंजाब, हरियाणा, राजस्थान तसेच दिल्ली-एनसीआर भागात हलक्या पावसाची शक्यता आहे, तर डोंगराळ भागांमध्ये बर्फवृष्टीचा जोर वाढणार आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वैज्ञानिक डॉ. नरेश कुमार यांनी उत्तर भारतातील हवामानाबाबत महत्त्वाची माहिती दिली. सध्या उत्तर पाकिस्तानवर सक्रिय पश्चिमी विक्षोभ निर्माण झाला असून, त्याचा परिणाम येत्या काही दिवसांत संपूर्ण उत्तर भारतात जाणवणार आहे. या विक्षोभामुळे वातावरणात आर्द्रता वाढून पावसासह थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.
डॉ. नरेश कुमार यांच्या मते, पश्चिम हिमालयीन परिसरात हलकी ते मध्यम पावसासह बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. विशेषतः बुधवारी काश्मीर खोऱ्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस किंवा मुसळधार बर्फवृष्टी होऊ शकते. यामुळे तापमानात लक्षणीय घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमधील उंच भागांमध्ये बर्फवृष्टीमुळे वाहतूक व्यवस्था, दैनंदिन जीवन आणि पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पर्यटकांनी आणि स्थानिक नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
मैदानी भागात पावसामुळे किमान तापमानात घट होऊन सकाळ-संध्याकाळ गारठा अधिक जाणवणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपड्यांचा वापर करावा, तसेच शेतकऱ्यांनी पिकांसाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असा सल्ला आयएमडीकडून देण्यात आला आहे.