जगभरातील पुरातत्त्व तज्ज्ञांना थक्क करणारा एक अद्भुत शोध समोर आला आहे. नामीबिया येथील नामीब वाळवंटात समुद्रात चालणारे, सोन्याने भरलेले तब्बल ५०० वर्षे जुने जहाज सापडले आहे. या शोधामुळे एकच प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे — समुद्रात धावणारे जहाज वाळवंटाच्या मधोमध कसे पोहोचले?
futura sciences.com च्या माहितीनुसार, हा ऐतिहासिक शोध २००८ साली नामीबियामध्ये हिऱ्यांच्या खाणकामादरम्यान लागला. खाणीतून पाणी उपसण्यात आल्यानंतर सुमारे २०० मीटर क्षेत्रात उत्खनन सुरू असताना पुरातत्त्वविदांना एक मोठा लाकडी सांगाडा आढळून आला. सुरुवातीला सामान्य अवशेष वाटणारा हा सांगाडा पुढील तपासणीत एका भव्य जहाजाचा असल्याचे स्पष्ट झाले.
संशोधनानंतर या जहाजाला ‘ओरांजेमुंड शिपव्रेक’ असे नाव देण्यात आले. पुढील ऐतिहासिक कागदपत्रे आणि संरचनात्मक तपासणी केल्यानंतर हे जहाज ‘Bom Jesus’ असल्याचे निष्पन्न झाले. हे जहाज १५०० च्या दशकात पोर्तुगालमधून भारताकडे प्रवास करत असताना समुद्रात बुडाले होते, अशी माहिती संशोधकांनी दिली आहे.
विशेष म्हणजे, या जहाजामध्ये सोन्याची नाणी, तांब्याचे पट्टे, तोफा, शस्त्रे आणि दैनंदिन वापराच्या वस्तू मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. त्यामुळे हा शोध केवळ ऐतिहासिकच नव्हे, तर आर्थिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
तज्ज्ञांच्या मते, जहाज समुद्रात बुडाल्यानंतर समुद्रकिनाऱ्यालगत वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आणि वाळूच्या हालचालींमुळे हळूहळू वाळवंटात गाडले गेले असावे. हजारो वर्षांच्या भूगर्भीय बदलांमुळे आज ते पूर्णपणे मरुभूमीच्या मध्यभागी असल्याचे दिसत आहे.
हा शोध युरोपीय सागरी व्यापार, पोर्तुगीज साम्राज्याचा विस्तार आणि प्राचीन समुद्री मार्गांवर नवे प्रकाश टाकणारा ठरत आहे. आजही हे जहाज इतिहासप्रेमी आणि संशोधकांसाठी एक मोठे गूढ आणि अभ्यासाचा विषय बनले आहे.