महाराष्ट्रात उष्णतेचा रेड अलर्टसदृश इशारा! पुढील ३ दिवस तापमान ४६ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता.

पुणे:१२ मे २०२६ ,महाराष्ट्रात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून पुढील तीन दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. India Meteorological Department आणि पुणे प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यातील बहुतांश जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विशेषतः विदर्भात तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून काही ठिकाणी पारा ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकतो.
सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. अकोला येथे ४४.९ अंश, अमरावती ४४.६ अंश, वर्धा ४३.२ अंश, नागपूर ४२.२ अंश आणि चंद्रपूर ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता नसल्याने उष्णतेची तीव्रता आणखी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विदर्भात ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा प्रभाव कमी झाल्यामुळे उत्तरेकडून गरम वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे तापमानात ४ ते ६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होऊ शकते. नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रकोप अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, हलका आहार घेणे, डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करणे तसेच उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.