करमाळा (जि. सोलापूर) | गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे करमाळा तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. चिलवडी (राशीन) गावातील कॅनेल फुटल्याने तळे व ओढे ओव्हरफ्लो झाले असून पाणी मोठ्या प्रमाणात शेतात व घरामध्ये शिरले आहे. गावातील रस्ते जलमय झाल्यामुळे नागरिकांच्या हालचालींवर मर्यादा येत आहेत.
दरम्यान, कोर्टी परिसरात अतिवृष्टीमुळे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उभ्या पिकांचे पाणीखाली जाण्याची शक्यता असून शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. करमाळा तालुका तसेच शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यातील काही गावांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.
नदी-नाले खळखळून वाहत असल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे. प्रवास, दैनंदिन कामे आणि आवश्यक गरजांसाठी नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून काही गावांचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांना नदी-नाल्यांच्या काठावर जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.