Home Breaking News सहजपूर ग्रामस्थांचा विकासकामांसाठी एल्गार; मागण्या मान्य न झाल्यास पुणे–सोलापूर महामार्ग बंद करण्याचा...

सहजपूर ग्रामस्थांचा विकासकामांसाठी एल्गार; मागण्या मान्य न झाल्यास पुणे–सोलापूर महामार्ग बंद करण्याचा इशारा.

48
0

सहजपूर ग्रामस्थांचा विकासकामांसाठी एल्गार; मागण्या मान्य न झाल्यास पुणे सोलापूर  महामार्ग बंद करण्याचा इशारा

सहजपूर, ता. दौंड | 13 मे 2026 पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सहजपूर गावात विविध विकासकामांच्या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गावातील रस्ते, पाणीपुरवठा, गटार व्यवस्था, सार्वजनिक सुविधा, स्थानिक युवकांना रोजगार आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित अनेक प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

सामाजिक कार्यकर्ते उमेश महादेव म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. अनेक वेळा निवेदने देऊनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. सरपंच विशाल सुरेश म्हेत्रे, विजय म्हेत्रे, उपसरपंच नितीन कांबळे आणि रोहन कांबळे यांनी प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन गावाच्या मूलभूत समस्या सोडवाव्यात, अशी मागणी केली.

आंदोलनात माजी सरपंच जीवन म्हेत्रे, सरपंच निलेश म्हेत्रे, राजू शेठ पांगारकर आणि सुशांत दरेकर यांनीही सहभाग घेतला. आमदार राहुल कुल यांच्या दुर्लक्षाबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. तसेच PMRD प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी गावाच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली ताई नागवडे यांनी आंदोलनाला पाठिंबा देत ग्रामस्थांच्या मागण्यांवर शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. सहजपूरमध्ये 18 कंपन्या कार्यरत असूनही स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य दिले जात नसल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, लवकरात लवकर विकासकामे सुरू झाली नाहीत आणि प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष सुरूच ठेवले तर पुणे–सोलापूर महामार्ग बंद करून आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनामुळे दौंड तालुक्यात राजकीय आणि सामाजिक चर्चांना वेग आला असून प्रशासनावर दबाव वाढला आहे.