Home Breaking News पुण्यात विषारी दारू प्रकरणाचा तपास वेगात; ६ आरोपी अटकेत, मेथेनॉल पुरवठादारांचा शोध...

पुण्यात विषारी दारू प्रकरणाचा तपास वेगात; ६ आरोपी अटकेत, मेथेनॉल पुरवठादारांचा शोध सुरू.

49
0

पुण्यात विषारी दारू प्रकरणाचा तपास वेगात; ६ आरोपी अटकेत, मेथेनॉल पुरवठादारांचा शोध सुरू.

Pune: 2 जून :पुण्यातील दापोडी व हडपसर परिसरात विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) वर्ग करण्यात आला असून तपासासाठी १० विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार आणि मेथेनॉल पुरवठादारांचा शोध सुरू आहे.

दापोडी पोलीस ठाणे व हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासादरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागानेही कारवाई करत आकाश जाधव, इरफान निसार कुरेशी आणि आर्यन संजय धोत्रे यांना अटक केली आहे.घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज, नमुने आणि इतर पुरावे जप्त करण्यात आले असून ते न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेत (FSL) तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आरोपींचे मोबाईल फोन जप्त करून त्यांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. विषारी दारूमध्ये वापरलेल्या मेथेनॉलचा पुरवठा कोठून झाला, याचा तपासही सुरू आहे.

 

राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच अन्न व औषध प्रशासनाकडील संबंधित गुन्ह्यांची माहिती संकलित करून तपास अधिक व्यापक करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाने दिली आहे.