नाशिकमध्ये अन्न भेसळीविरोधात FDAची कारवाई; ४८.८१ लाखांचा फ्राइड ओनियनसह अन्नसाठा जप्त.
नाशिक : २० सप्टेंबर २०२६
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नाशिकमध्ये मोठी कारवाई करत तब्बल ४८ लाख ८१ हजार ९२० रुपयांचा अन्नसाठा जप्त केला आहे. सय्यद पिंप्री येथील ‘मे. छाया ॲग्री प्रा. लि.’ या कारखान्यावर गुरुवारी (१७ सप्टेंबर) छापा टाकण्यात आला. या कारवाईत निकृष्ट दर्जाच्या तेलात तयार करण्यात आलेला १२ हजार ८ किलो फ्राइड ओनियन (बेरिस्टा) आणि खाद्यतेल जप्त करण्यात आले.
तपासणीदरम्यान कारखान्यात अत्यंत अस्वच्छ आणि बकाल परिस्थिती असल्याचे FDA अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. कांदा तळण्यासाठी वापरले जाणारे खाद्यतेल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. हे तेल वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या काळ्या ऑइलसारखे दिसत असल्याचेही सांगण्यात आले.
FDAच्या माहितीनुसार, संबंधित कारखान्यात मानवी आरोग्यास घातक ठरू शकणाऱ्या परिस्थितीत फ्राइड ओनियन तयार केला जात होता. अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे प्रशासनाने नमूद केले असून, संबंधित कारखान्याचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
जप्त केलेल्या साठ्याचा तपशील
– बेरिस्टा (तळलेला कांदा) – १२,००८ किलो – ₹४८ लाख ३ हजार २००
– रिफाइन्ड सूर्यफूल तेल – ३२८ किलो – ₹७८ हजार ७२०
– एकूण जप्त साठा – ₹४८ लाख ८१ हजार ९२०
चौकशीत हा फ्राइड ओनियन नाशिकमधील हॉटेल्स, बिर्याणी हाऊस, फूड सेंटर आणि फास्ट फूड सेंटरना पुरवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच आंध्र प्रदेशासह इतर राज्यांमध्येही या उत्पादनाचा पुरवठा केला जात असल्याचे प्रशासनाच्या तपासणीत आढळून आले.
अन्न सुरक्षा अधिकारी संदीप देवरे यांच्या माहितीनुसार, कारखान्यात अस्वच्छ वातावरणात निकृष्ट तेलाचा वापर करून ‘बेरिस्टा’ तयार केला जात होता. त्यामुळे प्रशासनाने संबंधित कारखान्यावर कारवाई करत परवाना रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू केली आहे.
दरम्यान, FDAने प्रतिबंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकवरही मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे १ कोटी १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चौघांसह एका कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचा सुमारे सहा तास पाठलाग केल्यानंतर राजगुरुनगर टोलनाक्यापुढे तो पकडण्यात आला


