महाराष्ट्राच्या राजकीय घराण्याची लेक ठरली स्वीडनच्या स्टॉकहोम सिटीतून खासदार; नीला विखे पाटील नक्की कोण?
नीला विखे पाटील कोण आहेत? महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या नीला विखे पाटील यांची स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून खासदार म्हणून निवड झाली आहे. ४१ वर्षांच्या नीला या महाराष्ट्रातील प्रसिद्ध विखे पाटील घराण्याच्या लेक आहेत.
महाराष्ट्रातील शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेवर निवडून आल्या आहेत. ही घोषणा शनिवारी करण्यात आली. स्वीडनमध्ये १३ सप्टेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत ४१ वर्षीय नीला या स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या. ३४९ सदस्यांच्या संसदेचा भाग होणे खूप छान वाटत आहे, अशी भावना व्यक्त करत त्या म्हणाल्या, “मी शहर आणि देशासाठी योगदान देण्यास उत्सुक आहे. ज्यांना मतदान करता येत नाही, त्यांचा आवाज मला बनायचे आहे. बालकल्याण आणि पर्यावरण हे माझे आवडीचे विषय असतील.”
नीला या आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पणती आणि दिवंगत केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या नात आहेत. त्या म्हणाल्या, “मला आशा आहे की मी माझ्या आजोबांचे नाव उज्ज्वल करेन. मी १५ वर्षांची असताना त्यांनी मला राज्याचा अर्थसंकल्प वाचायला सांगितला होता.” स्टीफन लोफवेन यांच्या कार्यकाळात नीला यांनी स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणूनही काम केले आहे.

