पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा; नंदन निलेकणींच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स स्थापन.

नवी दिल्ली:२६जुलै :देशातील विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करण्याची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांचा परीक्षांवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आणि परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित, पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी आधार प्रकल्पाचे प्रमुख शिल्पकार नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय (High-Powered) टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे.
इन्स्टाग्रामवरील विशेष व्हिडिओ संदेशातून पंतप्रधान मोदी यांनी ही घोषणा केली. NEET-UG 2026 मधील कथित पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षांमधील गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू असून, त्यांना शिक्षा मिळावी यासाठी फास्ट-ट्रॅक न्यायालयांची स्थापना करण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
परीक्षा प्रक्रियेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर तरतुदी असलेला नवीन कायदा संसदेत मांडला जाणार असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली. नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्स अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि हॅक-प्रूफ करण्यासाठी आवश्यक शिफारसी सरकारला सादर करणार आहे. या शिफारशींची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करून देशातील परीक्षा व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आणि परीक्षा व्यवस्थेतील सुधारणांना गती देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.