Home Breaking News बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत  विजय.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत  विजय.

21
0

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत  विजय

पुणे: ४ मे २०२६ बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत  विजय झाला असून त्यांनी तब्बल २,१८,९३० मतांच्या फरकाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या विजयामुळे त्यांनी देशातील सर्वात मोठ्या मताधिक्याचा विक्रमही मोडला आहे.

या निवडणुकीत त्यांना सत्ताधारी महायुतीसह महाविकास आघाडीतील अनेक पक्षांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. अधिकृत घोषणा होताच त्यांनी बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली.

विजयानंतर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळेच हा विजय शक्य झाला. तसेच महायुती, महाविकास आघाडी, मित्रपक्ष, विविध संस्था आणि संघटनांचेही त्यांनी आभार मानले. भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल तमाम  बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार.आपण दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे

त्यांनी पुढे सांगितले की, शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत तसेच यशवंतराव चव्हाण आणि अजित पवार यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा निर्धार त्या कायम ठेवतील. बारामतीच्या विकासासाठी तरुणाई, शेतकरी, महिला, उद्योजक आणि सर्व समाजघटकांना केंद्रस्थानी ठेवून एकत्रित काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

तसेच, “निवडणुका येतात-जातात, पण बारामतीचा सलोखा कायम राहिला पाहिजे. कोणताही जल्लोष न करता आपण कामातूनच हा विजय साजरा करूया,” असे सांगत त्यांनी संयमाचे आवाहन केले.

शेवटी, “बारामतीकरांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कधीही कमी पडू देणार नाही. त्यांच्या सुख-दुःखात सदैव खंबीरपणे उभी राहीन,” असे आश्वासन देत त्यांनी जनतेशी नाते दृढ करण्याचा संदेश दिला.