Home Breaking News पिंपरी-चिंचवडमध्ये १० टक्के पाणीकपात; पाण्याची नासाडी केल्यास थेट कारवाई

पिंपरी-चिंचवडमध्ये १० टक्के पाणीकपात; पाण्याची नासाडी केल्यास थेट कारवाई

15
0

पिंपरी-चिंचवडमध्ये १० टक्के पाणी कपात; पाण्याची नासाडी केल्यास थेट कारवाई.

दररोजच्या पाणीपुरवठ्यात सुमारे ६५ एमएलडीची घट; एसटीपी बंद ठेवणाऱ्या सोसायट्यांचे नळजोड तोडणार, मोटार पंप जप्तीचाही इशारा

पिंपरी : संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि उपलब्ध जलसाठ्याचे दीर्घकालीन नियोजन लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड शहरात १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाच्या आदेशानुसार ही पाणीकपात ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत कायम राहणार आहे. पाण्याची नासाडी करणाऱ्यांविरोधात दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पवना, आंद्रा आणि एमआयडीसीच्या माध्यमातून शहराला दररोज सुमारे ६५० एमएलडी पाणी उपलब्ध होते. सध्या पवना आणि आंद्रा धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असला, तरी ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे भविष्यात उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कपात करण्यात आली आहे. दहा टक्के कपातीमुळे शहराला दररोज सुमारे ६५ एमएलडी पाणी कमी मिळणार आहे. त्यामुळे काही भागांत नियमित वेळेपेक्षा कमी कालावधीसाठी पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

एसटीपी बंद ठेवला तर नळजोड तोडणार

मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी उद्याने, झाडे आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी पिण्याचे पाणी न वापरता सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील (एसटीपी) प्रक्रिया केलेले पाणी वापरणे आवश्यक आहे. एसटीपीची सुविधा असूनही ती बंद ठेवणाऱ्या सोसायट्यांचे नळजोड कायमस्वरूपी तोडण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरण्यास मनाई

बांधकाम व्यावसायिकांनीही बांधकामासाठी एसटीपीमधील प्रक्रिया केलेल्या पाण्याचाच वापर करावा. नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या पाणी उपसून टँकरद्वारे त्याची विक्री करणाऱ्यांविरोधात थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

वाहने धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरणाऱ्या वॉशिंग आणि सर्व्हिस सेंटरवरही महापालिकेची नजर राहणार आहे. अशा ठिकाणी अनधिकृत नळजोड आढळल्यास तो खंडित करून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. नवीन व्यावसायिक आस्थापनांना नळजोड देण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

नळाला मोटार लावल्यास पंप जप्त

महापालिकेच्या नळाला थेट मोटार पंप जोडून पाणी खेचणाऱ्यांविरोधातही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. असा प्रकार आढळल्यास संबंधित मोटार पंप जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाईल. पाण्याचा अपव्यय शोधण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन, रावेत-किवळे-मामुर्डी तसेच चिखली-मोशी-चरहोली फेडरेशनने नागरिक आणि सोसायट्यांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. फेडरेशनचे दत्तात्रेय देशमुख यांनी सोसायट्यांसाठी पाणीबचतीच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.

त्यामध्ये वाहने धुण्यासाठी पाइपऐवजी बादलीचा वापर करणे, पार्किंग, लॉबी, अंतर्गत रस्ते आणि गच्ची दररोज पाण्याने न धुणे, गळके नळ व फ्लश टाक्या तातडीने दुरुस्त करणे तसेच छतावरील पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होणार नाहीत याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“आज वाचवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब उद्याची सुरक्षितता ठरवणार आहे. नागरिकांनी पाण्याचा अनावश्यक साठा किंवा अपव्यय करू नये. पाणी काटकसरीने वापरून महापालिकेला सहकार्य करावे. पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.