शाळकरी विद्यार्थी, नोकरदारांची तारांबळ; हिंजवडी आयटी पार्कसह शहरातील अनेक भागांत पावसाची जोरदार हजेरी.
पुणे : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सोमवारी (२ नोव्हेंबर) पहाटेपासून अवकाळी पावसाने जोरदार लावली. रविवार मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर सोमवारी सकाळीही कायम राहिल्याने कामावर जाणारे नोकरदार, शाळकरी विद्यार्थी आणि पालकांची मोठी तारांबळ उडाली.
पुण्यातील कोथरूड, बाणेर, सिंहगड रोड, हडपसर, स्वारगेट आणि शिवाजीनगर परिसरात मुसळधार पाऊस झाला. तसेच पिंपरी-चिंचवड, भोसरी आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरालाही पावसाने झोडपले. चिंचवडमध्ये रविवारी अवघ्या एका तासात १०४.५ मिमी पावसाची नोंद झाल्याने पावसाची तीव्रता स्पष्ट झाली.
सततच्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून, प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक संथ झाली आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी पावसामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. सध्या शाळांमध्ये परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना आणि त्यांना शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या पालकांनाही पावसाचा फटका बसला.
दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार सोमवारी दिवसभर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. पुढील काही दिवस पुणे आणि परिसरात अवकाळी पावसाचे वातावरण कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.