मुंबईकडे जाणाऱ्यांनो सावधान! समृद्धी महामार्गावर २६ ऑक्टोबरपासून १२ दिवस वाहतूक ब्लॉक.
२६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान दिवसातून तीन वेळा एक तासाचा ब्लॉक; दरड कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी संरक्षक जाळ्या बसवणार
नाशिक, दि. २५ ऑक्टोबर २०२६ (पोलखोलनामा न्यूज) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) २६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या १२ दिवसांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वेळापत्रक पाहूनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
समृद्धी महामार्गावरील भरवीर ते इगतपुरी इंटरचेंजदरम्यान डोंगर उतारांवर तसेच बोगद्यांच्या प्रवेशद्वारांजवळ संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या परिसरात दरड किंवा दगड कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही उपाययोजना करण्यात येत आहे.
वाहतूक ब्लॉकचे वेळापत्रक :
* सकाळी : १० ते ११ वाजेपर्यंत
* दुपारी : १ ते २ वाजेपर्यंत
* सायंकाळी : ४ ते ५ वाजेपर्यंत
या कालावधीत इगतपुरी ते भरवीर इंटरचेंजदरम्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकांवरील वाहतूक निर्धारित वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित मार्गावर वाहनांच्या रांगा लागण्याची तसेच प्रवासाला विलंब होण्याची शक्यता आहे.
नागपूर ते मुंबई असा सुमारे ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग राज्यातील महत्त्वाचा द्रुतगती मार्ग आहे. या महामार्गावरील अपघातांचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी संरक्षक जाळ्या बसवण्यात येणार आहेत.
दरम्यान, वाहनचालकांनी प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतूक ब्लॉकचे वेळापत्रक तपासावे, शक्यतो पर्यायी वेळेत प्रवास करावा आणि महामार्गावरील वाहतूक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन एमएसआरडीसीकडून करण्यात आले आहे.