वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई; जबरी चोरीसह वाहनचोरीचा पर्दाफा.
११ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त; दोन मोटारसायकली व सोन्याचे दागिने हस्तगत
बारामती : वडगाव निंबाळकर पोलिसांनी जबरी चोरी आणि मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्यातील चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन मोटार सायकली आणि सोन्याचे दागिने असा एकूण ११ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जबरी चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा छडा लागला आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोळे कन्हाडवाडी गावाच्या हद्दीत कन्हाडवाडी ते बावी रोडवरील शेतात काम करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मणी व डोरले जबरीने हिसकावून मोटारसायकल वरून आलेल्या चोरट्यांनी चोरी केल्याची तक्रार पोलिसांनकडे दाखल झाली होती. तक्रारीनुसार, ६ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे सुमारे ४.४५ वाजता अज्ञात तीन चोरट्यांनी चोरी केली, असे तक्रारीमध्ये सांगण्यात आले आहे.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय माहिती, तांत्रिक माहिती तसेच सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. तपासादरम्यान राज मिथून शिंदे (रा. राजाळे, ता. फलटण, जि. सातारा), सनी रमण भोसले (रा. राजकुम बंगल, सांगवी, ता. फलटण, जि. सातारा) आणि पवन सेंडल काळे (रा. मांडगावमाळ, विडणी, ता. फलटण, जि. सातारा) यांची नावे समोर आली.
संशयितांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी यवत, जेजुरी, बारामती शहर, वालचंदनगर, लोणंद आणि फलटण शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जबरी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या गुन्ह्यांमध्ये आणखी आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी वायुपाव भानुदास चोपडे (रा. राजाळे, ता. फलटण, जि. सातारा) आणि प्रविण ज्ञानेश्वर वेदपाठक (रा. मारकडपेठ, फलटण, जि. सातारा) यांच्याकडूनही माहिती घेतली.
तपासात आरोपींकडून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने आणि दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ११ लाख ६८ हजार रुपये आहे. या तपासातून जबरी चोरीचे एकूण ९ गुन्हे उघडकीस आले असून, आणखी एका गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणात राज मिथून शिंदे, सनी रमण भोसले, वायुपाव भानुदास चोपडे आणि प्रविण ज्ञानेश्वर वेदपाठक यांना अटक करण्यात आली आहे. तर पवन सेंडल काळे हा फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिदार, बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस हवालदार पोपट नाळे, अनिल खेडकर, आवा जाधव, नरेश यादव, धनंजय भोसलें, हृदयनाथ टेककर, सुजज धोत्रे, भाऊसाहेब मारक व इतर कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते करीत आहेत.
