सिंहगडावर पर्यटकांना मारहाण; आठजणां विरुद्ध गुन्हा दाखल.
पुणे : सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना मारहाण केल्याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १६ ऑगस्ट २०२६ रोजी सिंहगड किल्ला परिसरात घडली. या प्रकरणी अवधूत पांडुरंग पाटील (वय ३९, रा. डीएसके रोड, धायरी, पुणे) यांनी हवेली पोलिसांकडे फिर्याद दिली.
फिर्यादीनुसार, अवधूत पाटील हे आपल्या पत्नी, मुलगा तसेच त्यांचा मित्र, मित्राची पत्नी व मुलगी यांच्यासह १६ ऑगस्ट रोजी सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेले होते. यावेळी काही व्यक्तींनी फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेल्या पर्यटकांना अडवून त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. प्लास्टिकच्या काठीने मारहाण केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
रविवारची सुट्टी असल्याने सिंहगडावर मोठी गर्दी झाली होती. पर्यटनाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने पर्यटक किल्ल्यावर आले होते. गर्दीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांमध्ये वादाची परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळताच बंदोबस्तावरील पोलिसांनी हस्तक्षेप केला. परिस्थिती नियंत्रणात आणून संबंधितांना पोलीस ठाण्यात येण्याबाबत समज देण्यात आली.
या घटनेप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून हवेली पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ७४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील कलम 115(2), 118(1), 189(2), 191(2) आणि 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये संकेत संजय पाटील याच्यासह एकूण आठ जणांचा समावेश असल्याचे पोलीस नोंदीत नमूद आहे.
या प्रकरणातील आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून, संबंधित कलमांनुसार नोटीस बजावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. प्रकरणाचा पुढील तपास हवेली पोलीस करीत आहेत.
