Home Breaking News रस्ते ३१ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

रस्ते ३१ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

47
0

ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन करा ,रस्ते ३१ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश.

पुणे, दि. ७ : जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाने आता ब्लॅक स्पॉट, अपघातप्रवण जंक्शन, खड्डे आणि महामार्गालगतची अतिक्रमणे यावर वेळबद्ध कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन करावे, अपघातप्रवण जंक्शनची सुधारणा सहा महिन्यांत करावी, तसेच जिल्ह्यातील रस्ते ३१ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. महामार्गालगतची अतिक्रमणेही १५ दिवसांत हटवावीत, असेही त्यांनी संबंधित यंत्रणांना सांगितले.

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अधीक्षक अभियंता भरत कुमार बाविस्कर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत अपघातप्रवण स्थळे, रस्त्यांची सुरक्षितता, वाहतूक नियमन, जंक्शन सुधारणा, खड्डे, अतिक्रमणे आणि रस्ता सुरक्षा जनजागृतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत निरीक्षण करून निश्चित करण्यात आलेल्या ४३ ब्लॅक स्पॉटवर राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या ठिकाणी केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता अपघातांची कारणे शोधून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. रस्त्यांची रचना, वळणे, चौक, प्रकाश व्यवस्था, दिशादर्शक व सूचना फलक, रस्त्यांवरील पट्टे आदींची पाहणी करून आवश्यक स्थापत्य सुधारणा कराव्यात. गतिरोधक निर्धारित तांत्रिक निकषांनुसारच उभारावेत, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, वेगमापन यंत्रणा आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. अपघातप्रवण स्थळांचे भौगोलिक अंकन करून वाहनचालकांना आगाऊ सूचना मिळतील, यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.

जंक्शन सुधारणा, खड्डे व अतिक्रमणांवर कठोर कार्यवाही

जिल्ह्यातील अपघातप्रवण जंक्शनची सुधारणेची कामे पुढील सहा महिन्यांत पूर्ण करावीत. रस्त्यांवरील सर्व खड्डे भरण्याची कार्यवाही ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावी. रस्ते सुरक्षिततेच्या कामात कोणतीही दिरंगाई होणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

राष्ट्रीय महामार्ग तसेच प्रमुख महामार्गालगतची अतिक्रमणे संबंधितांनी १५ दिवसांच्या आत स्वतःहून काढून घ्यावीत. निर्धारित मुदतीत अतिक्रमणे न हटविल्यास संबंधित महामार्ग यंत्रणांनी पोलीस विभागाच्या मदतीने ती तातडीने हटवावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले.

रस्ते कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष नको

जिल्ह्यात ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक दिशादर्शक, सूचना फलक आणि सुरक्षा उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. रस्ते कामाच्या ठिकाणी सुरक्षा मानकांचे पालन न केल्यास संबंधित कंत्राटदार तसेच जबाबदार यंत्रणेवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.

रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी. तसेच रस्ता सुरक्षा नियमांबाबत वाहनचालक आणि नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी, असेही निर्देश देण्यात आले.

बैठकीस विविध विभागांचे प्रमुख आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते