मंत्रिमंडळ बैठकीवर ‘तुकाराम मुंढेचा प्रभाव’? राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय.
मुंबई | १ सप्टेंबर २०२६ :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आरोग्यदायी अन्न, अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र, सिंचन प्रकल्प आणि पायाभूत सुविधांशी संबंधित चार महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आरोग्यदायी अन्नाबाबत घेतलेल्या निर्णयाची विशेष चर्चा होत आहे.
१) सरकारी बैठकीत मिळणार आरोग्यदायी अन्न
शासकीय व निमशासकीय बैठका, कार्यक्रम तसेच उपहारगृहांमध्ये आरोग्यदायी व पौष्टिक अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या धोरणाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. संतुलित मेन्यू ठेवणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२) २०२९ पर्यंत ‘अमली पदार्थमुक्त महाराष्ट्र’
राज्यातून अमली पदार्थांचे मूळ नष्ट करण्यासाठी ‘Whole of Government Approach’ अंतर्गत सर्वसमावेशक धोरण राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोहिमेत विविध शासकीय विभागांचा समन्वय साधला जाणार आहे.
३) कुकडी पाटबंधारे प्रकल्पाला मोठी मंजुरी
पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या ५,७०४.५० कोटी रुपयांच्या सुधारित खर्चास मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामुळे तब्बल १ लाख ४४ हजार ९१२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.
४) सोलापूरसह पायाभूत सुविधांना गती
सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका या दरम्यानच्या उन्नत मार्ग प्रकल्पाला सार्वजनिक प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील प्रकल्पासाठी आवश्यक शासकीय जमीन NHAI कडे हस्तांतरित करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
थोडक्यात : आरोग्यदायी अन्नापासून अमली पदार्थविरोधी मोहीम, सिंचन आणि पायाभूत सुविधांपर्यंत राज्य मंत्रिमंडळाने आज विकास आणि सार्वजनिक आरोग्यावर भर देणारे निर्णय घेतले.
