देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील दोन अमृत रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण.
बारामती रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळेल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार.
बारामती : १७ जुलै ;अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ अत्याधुनिक रेल्वे स्थानकांचे तसेच महाराष्ट्रातील बारामती आणि नांदुरा या दोन पुनर्विकसित रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. बारामती रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला गती देणारा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले.
यावेळी पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, रेल्वे विभागाचे अधिकारी-कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वे आधुनिकतेकडे वेगाने वाटचाल करत असून जागतिक दर्जाच्या सुविधा, सुरक्षित प्रवास आणि प्रवासीस्नेही सेवा यामुळे रेल्वे नव्या भारताच्या विकासाचे प्रतीक बनल्याचे नमूद केले.
सुमारे २६.५ कोटी रुपये खर्चून बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला आहे. आधुनिक प्रतीक्षागृह, स्वच्छ प्रसाधनगृहे, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ सुविधा, सीसीटीव्ही सुरक्षा व्यवस्था, सौरऊर्जा प्रणाली तसेच स्थानिक हस्तकला आणि उत्पादनांच्या विक्रीसाठी विशेष दालन अशा अत्याधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमानंतर त्यांनी स्थानकावरील कोनशिलेचे अनावरण करून पुनर्विकसित रेल्वे स्थानकाची पाहणी केली तसेच रेल्वेतील विक्रेत्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या