पिंपरी: युवा आमदार अमित गोरखे यांचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. विविध राजकीय पक्षाचे नेते, कलावंत, साहित्यिक कामगार आणि कष्टकरी कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि मांदियाळी उल्लेखनीय होती. साहित्य प्रदर्शन आणि विविध सामाजिक उपक्रम साजरे झाले. सर्वपक्षीय नेत्यांनी गोरखे यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला. मैत्र भाव जपला. “वाढदिवसानिमित्त साहित्याचा जागर केलेला पहिलाच आमदार, असे उद्गार राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे पुणे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी यांनी काढल्याने आमदार गोरखे यांच्या कार्याची प्रचिती आली. वाढदिवस सोहळा हा “सेवा, संवेदना आणि समाज बांधिलकीचा उत्सव” ठरला.

राजश्री शाहू क्रीडांगण, शाहूनगर, चिंचवड येथे आमदार अमित गोरखे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला १०,००० हून अधिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहून आमदार गोरखे यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. संपूर्ण मैदानात जनतेचा उत्स्फूर्त सहभाग, जयघोष आणि आनंदोत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले.
असे झाले कार्यक्रम….
वाढदिवस कार्यक्रमाची सुरुवात सामाजिक जाणीव जपत करण्यात आली. दिव्यांग व्यक्तींना सायकलचे वाटप करून समाजातील वंचित घटकांना सहाय्य करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५ लाख रुपयांचा धनादेश शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. सामाजिक कार्याच्या या वाटचालीत आमदार गोरखे यांनी विद्याभारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत यांना ₹५१,००० आणि पूजनीय श्री गुरुजी न्यास यांनाही ₹५१,००० रुपयांचा धनादेश सुपूर्त करून शिक्षण व संस्कार क्षेत्राला बळकटी दिली. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले तसेच त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वतः आमदार गोरखे यांनी स्वीकारली. तसेच आपल्या लाडक्या बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, पापड उद्योगासोबत टायअप करून शेकडो महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम या अभिष्टचिंतन सोहळ्यात जाहीर करण्यात आला. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील प्राधिकरण, निगडी आणि चिंचवड परिसरात स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने अन्नदान व आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

साहित्य जागर असाही!
संभाजीनगर येथील नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणावर भव्य प्रदर्शन भरवण्यात आले आहे. उद्घाटन मा गिरीषजी आफळे यांच्या हस्ते पार पडले यावेळी ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाचे देवळेकर सर उपस्थित होते. त्यामध्ये विविध सुमारे २० हजारांपेक्षा जास्त पुस्तके उपलब्ध असून हे प्रदर्शन ६ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. या प्रदर्शनात कथा, कादंबरी, काव्यसंग्रह वैचारिक व चिंतनात्मक पुस्तकांचा समावेश आहे. ते खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर साहित्य रसिकांची गर्दी उसळली होती.
