Home Breaking News हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला निवडणुकीच्या आचारसंहितेचा ब्रेक; उद्घाटन ऑक्टोबरअखेरपर्यंत लांबले

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला निवडणुकीच्या आचारसंहितेचा ब्रेक; उद्घाटन ऑक्टोबरअखेरपर्यंत लांबले

34
0

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला निवडणुकीच्या आचारसंहितेचा ब्रेक; उद्घाटन ऑक्टोबरअखेरपर्यंत लांबले.

पुणे : २४ सप्टेंबर २०२६

पुणेकरांसह आयटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर ‘पुणेरी मेट्रो’च्या उद्घाटनाला पुन्हा विलंब झाला आहे. या महिन्याच्या अखेरीस मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागणार आहे.

हिंजवडी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या या मेट्रो मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू होण्याची प्रवाशांना प्रतीक्षा आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (CMRS) २३ जुलै रोजी माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण संग्रहालय (बालेवाडी) या १२ स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतुकीस मंजुरी दिली होती.

दरम्यान, आणखी पाच स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, या स्थानकांची CMRS कडून तपासणीही पूर्ण झाली आहे. या पाच स्थानकांवरील सेवेला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मेट्रोच्या उद्घाटनासाठी PMRDAने राज्य सरकारला पत्र दिले होते. राज्य सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे.

ही आचारसंहिता २७ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार असल्याने या काळात मेट्रोच्या उद्घाटनाचा सरकारी कार्यक्रम घेता येणार नाही. त्यामुळे हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू होण्यासाठी ऑक्टोबरअखेरपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. परिणामी, पुणेकरांना ही बहुप्रतीक्षित मेट्रो सेवा दिवाळीच्या आसपास उपलब्ध होण्याची शक्यता आहे.