Home Breaking News सहकार क्षेत्राला डिजिटल बळ; अमित शाह यांच्या हस्ते नागरी सहकारी बँकांसाठी नव्या...

सहकार क्षेत्राला डिजिटल बळ; अमित शाह यांच्या हस्ते नागरी सहकारी बँकांसाठी नव्या सेवांचा शुभारंभ.

37
0

सहकार क्षेत्राला डिजिटल बळ; अमित शाह यांच्या हस्ते नागरी सहकारी बँकांसाठी नव्या सेवांचा शुभारंभ.

मुंबई : ८ऑगस्ट ; केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत आयोजित ‘सहकार नव-क्रांती’ कार्यक्रमात सहकारी बँकिंग क्षेत्रातील विविध डिजिटल सेवांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सहकार सीबीएस प्रणालीशी जोडलेल्या उत्कृष्ट नागरी सहकारी बँकांचा सन्मान करण्यात आला.

नागरी सहकारी बँकांना सायबर हल्ले, ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर (SOC) सुरू करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून सायबर धोक्यांवर सातत्याने देखरेख, त्यांची तातडीने ओळख आणि आवश्यक उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

यासोबतच राष्ट्रव्यापी सेवा बंडलअंतर्गत कोअर बँकिंग, मोबाईल व इंटरनेट बँकिंग, UPI-IMPS, सायबर सुरक्षा, WhatsApp Chatbot, अनुपालन, Sovereign Cloud, AePS आणि DBT अशा विविध डिजिटल सेवांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नागरी सहकारी बँकांना आधुनिक, सुरक्षित आणि प्रभावी डिजिटल सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहेत.

कार्यक्रमात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरबीआयचे माजी उपमहाव्यवस्थापक जी. पी. मिस्त्री लिखित ‘Operational Risk Management – A Practical Guide to Urban Co-operative Banks’ आणि ‘भारत में सहकारी बैंकिंग की ऐतिहासिक यात्रा’ या पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री जयकुमार रावल यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.