Home Breaking News भक्ती-शक्ती चौकात रंगले निमंत्रितांचे काव्य संमेलन; अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याला कवींनी वाहिला मानाचा...

भक्ती-शक्ती चौकात रंगले निमंत्रितांचे काव्य संमेलन; अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याला कवींनी वाहिला मानाचा मुजरा.

78
0

भक्ती-शक्ती चौकात रंगले निमंत्रितांचे काव्य संमेलन; अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याला कवींनी वाहिला मानाचा मुजरा.

पिंपरी, दि. ८ ऑगस्ट २०२६ : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान राहिले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी तथा पत्रकार पितांबर लोहार यांनी केले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व-२०२६’ अंतर्गत भक्ती-शक्ती चौक, निगडी येथील अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात ६ ऑगस्ट रोजी निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन उत्साहात पार पडले.

या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी पितांबर लोहार होते. यावेळी विविध कवींनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्य, साहित्य, सामाजिक संघर्ष आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदानावर आधारित बहारदार कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

पितांबर लोहार यांनी ‘अण्णाभाऊची लेखणी’ ही कविता सादर करत अण्णाभाऊंच्या लेखणीचे सामर्थ्य अधोरेखित केले. ‘संयुक्त महाराष्ट्राची खणी, लाखात एक देखणी, मुंबई महाराष्ट्राची शान सांगे, अण्णाभाऊची लेखणी’ या ओळींनी वातावरण भारावून गेले.

कवी सुनील भिसे यांनी ‘दीड दिवसाची शाळा’, किशोर केदारी यांनी ‘समता’, अनिल दीक्षित यांनी ‘अण्णाभाऊंची लेखणी’, सुहास घुमरे यांनी ‘अर्थसत्ता’, तर दीपेश सुराणा यांनी ‘लोकशाहीर अण्णाभाऊंना मानाचा मुजरा’ या कविता सादर केल्या. विशाल कसबे यांनी ‘अण्णांच्या कवितांना सलाम’, आत्माराम हारे यांनी ‘सांस्कृतिक क्षेत्रातील परिस’, तर दत्तू ठोकळे यांनी ‘अण्णा ध्रुवतारा’ या रचनांमधून अण्णाभाऊंच्या कार्याला अभिवादन केले.

कवयित्री फुलवती जगताप यांनी ‘वालू आईच्या पोटी’, संजय साळुंखे यांनी ‘पुतळे रडत राहतील’, विनोद अष्टूल यांनी ‘१६ ऑगस्ट ओरडला’, अशोक टाकळे यांनी ‘गरिबांचे कैवारी शाहीर अण्णा भाऊ साठे’, देवेंद्र गावंडे यांनी ‘साहित्याची खान अण्णाभाऊ साठे’ या रचना सादर केल्या.

याशिवाय पुरुषोत्तम हिंगणकर यांनी ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे’, विजय कांबळे यांनी ‘लढा आरक्षणाचा’, महेंद्र पाटोळे यांनी ‘अण्णाभाऊ वंदन तुजला’, तर कवयित्री आशा शहाणे यांनी ‘महिला तुझी कहाणी’ ही भावनाप्रधान रचना सादर केली.

अध्यक्षीय भाषणात पितांबर लोहार यांनी सांगितले की, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अण्णाभाऊ साठे यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या ‘माझी मैना गावाकडं राहिली’ या छक्कडमधून व्यक्त झालेली खंत आजही कायम आहे. बेळगाव, कारवार आणि धारवाड ही अण्णाभाऊंची ‘मैना’ आजही गावाकडेच राहिली असल्याची खंत व्यक्त करत, ती महाराष्ट्राची व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

काव्यसंमेलनाचे प्रास्ताविक ज्येष्ठ कवी सुनील भिसे यांनी केले. कवी तथा पत्रकार किशोर केदारी यांनी बहारदार सूत्रसंचालन केले, तर कवी विशाल कसबे यांनी आभार मानले. विविध कवींच्या प्रभावी सादरीकरणामुळे भक्ती-शक्ती चौकातील स्मारक परिसरात अण्णाभाऊंच्या साहित्याचा आणि विचारांचा जागर झाला.