ईद-ए-मिलाद मिरवणुकीत नियमभंग; पुणे पोलिसांची ११ जणांवर कडक कारवाई!
पुणे : शहरात ईद-ए-मिलाद मिरवणुकीदरम्यान पोलिस प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे/डॉल्बी वाजवणे, लेझर व शार्प बीम लाईटचा वापर करणे तसेच सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस धोका निर्माण करणे काही मंडळांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहकारनगर, खडकी, कोंढवा आणि लष्कर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकूण ४ स्वतंत्र गुन्हे दाखल करून ११ जणांवर कारवाई केली आहे.
ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर २४ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे शहर पोलिस सहआयुक्त आणि विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्तांनी मिरवणुकीत लेझर बीम, शार्प लाईट्स, हाय-डेसीबल डीजे सिस्टीम आणि फटाके फोडण्यावर स्पष्ट बंदीचे आदेश दिले होते. मात्र, नियमांची पायमल्ली झाल्याने पोलिसांनी कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे. सहकारनगर पोलिसांची कारवाई
लाऊडस्पीकर चालक सिद्धार्थ अनिल जाधव (२६), मंडळ अध्यक्ष तौसिफ खलील शेख (३०) आणि ट्रॅक्टर चालक उत्तम गोरख कांबळे (४०) यांच्यावर डीजे सिस्टीमची मर्यादा ओलांडून मोठ्या आवाजात गाणी वाजवणे आणि वाहतुकीस धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. खडकी पोलिसांची कारवाई
‘हुसैनिया यंग सर्कल’चे अध्यक्ष इम्रान इस्माईल इनामदार (३०) आणि डीजे/लाईट चालक अमित कोंडीबा तापकीर (२८) यांच्यावर कारवाई करण्यात आली.
कोंढवा पोलिसांची कारवाई ‘एचपीके फ्रेंड्स सर्कल’चे अध्यक्ष उमर शब्बीर शेख, डीजे चालक गणपत तुकाराम कामठे (६०), ‘झुल्फिकार बॉईज’चे अध्यक्ष राहिल सय्यद मुजावर आणि डीजे चालक अन्वर इम्तियाज शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
लष्कर पोलिसांची कारवाई
‘एकता विकास प्रतिष्ठान’चे अध्यक्ष जाफर शफिक शेख, तसेच विनायक मधुकर नेहरे (४३), अरबाज पंजाबी आणि सुशांत अशोक शेवाळे (३६) यांच्यावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, ध्वनीप्रदूषणाचे नियम आणि मिरवणुकीसाठी घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढील काळातही कठोर कारवाई केली जाईल. पुण्यातील ईद-ए-मिलाद मिरवणुकीसाठी डीजेमुक्त वातावरण ठेवण्याबाबत प्रशासनाकडून आधीच सूचना देण्यात आल्या होत्या.