दिल्ली:दिल्लीत ४ मजली इमारतीला आग, ९ जणांचा मृत्यू: त्यात ३ मुलींचा समावेश; अग्निशमन दलाच्या जवानांनी १० जणांना वाचवले, दोघांनी उडी मारून स्वतःचा जीव वाचवला.
बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील पालम येथील साध नगरमधील ४ मजली निवासी इमारतीला भीषण आग लागली. या घटनेत तीन अल्पवयीन मुलींसह नऊ जणांचा मृत्यू झाला. इतर दोघांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उडी मारली. दोघेही गंभीर जखमी झाले. दिल्ली अग्निशमन सेवेच्या (डीएफएस) जवानांनी तीन जखमींसह १० जणांना वाचवले.
स्थानिकांच्या मते, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि ती वेगाने पसरली. त्यावेळी इमारतीत १०-१५ लोक होते. काही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दोन जखमींवर आयजीआय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.