Home Breaking News राज्यात मुसळधार पावसाचा कहर; पालघर-रायगडसह घाटमाथ्यावर रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना आज...

राज्यात मुसळधार पावसाचा कहर; पालघर-रायगडसह घाटमाथ्यावर रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी .

34
0

राज्यात मुसळधार पावसाचा कहर; पालघर-रायगडसह घाटमाथ्यावर रेड अलर्ट, अनेक जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी .

 

Pune:7 जुलै;NDRF-SDRF पथके सज्ज; मुंबई-पुण्यासह अनेक भागांत फ्लॅश फ्लडचा इशारा, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन.

राज्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून आज (7 जुलै) पालघर, रायगड तसेच नाशिक आणि पुण्याच्या घाटमाथा भागासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा पठारी भाग, साताऱ्याचा घाट प्रदेश तसेच अकोला आणि अमरावती येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड तसेच नाशिक आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर अचानक पूर (फ्लॅश फ्लड) येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी नदी-नाले, धबधबे आणि डोंगराळ भागात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यभरात 17 NDRF आणि 6 SDRF पथके तैनात करण्यात आली असून मुंबईत 4, पालघर व नागपूर येथे प्रत्येकी 2, तर पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि धाराशिव येथे प्रत्येकी एक NDRF पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन अतिवृष्टी, पूरस्थिती आणि मदतकार्याचा आढावा घेत सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील कनेक्टिंग लिंक परिसरात झालेली दरड हटविण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती MSRDC ने दिली आहे.

गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची नोंद झाली असून लोणावळ्यात तब्बल 670 मिमी पाऊस झाला आहे. हवामान विभागानुसार, 650 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद ही अत्यंत दुर्मीळ घटना मानली जाते. पुणे हवामान विभागाने पुढील 24 ते 48 तास कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून त्यानंतर पावसाची तीव्रता हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.