रायगड:आंबेनळी घाट पुन्हा चर्चेत; दहा वर्षांत अनेक भीषण अपघात, रखडलेल्या कामांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.

रायगड: २७ मे २०२६: सातारा जिल्ह्यातील आठ मित्रांचा आंबेनळी घाटातील भीषण अपघातात मृत्यू झाल्यानंतर महाबळेश्वर– रायगड जिल्ह्यातील पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा महत्त्वाचा घाटमार्ग गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक ठरत असून, वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या दशकभरात या घाटात अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. अनेकदा वाहने खोल दरीत कोसळून प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे घाटातील सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
रखडलेल्या कामांमुळे वाढला धोका
आंबेनळी घाटात सध्या विविध दुरुस्ती आणि रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. मात्र या कामांच्या संथ गतीमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत, तर काही भागात रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे. संरक्षण कठडे नसणे, धोकादायक वळणे आणि अपुरी सुरक्षाव्यवस्था यामुळे प्रवास अधिक धोकादायक बनला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरुवातीला या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर हा प्रकल्प महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमएसआयडीसी) कडे वर्ग करण्यात आला. पोलादपूर ते प्रतापगड पायथा या सुमारे २४ किलोमीटर मार्गाच्या कामांसाठी तब्बल १०० कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे.
मे २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
एमएसआयडीसीचे कार्यकारी अभियंता दिलीप हिंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पांतर्गत रस्त्याचे रुंदीकरण, मजबुतीकरण, संरक्षण कठडे उभारणे, नाले बांधणे, मोऱ्यांची दुरुस्ती, पुलांची पुनर्बांधणी तसेच दरडी कोसळण्याचा धोका कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
ही सर्व कामे मे २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र आगामी पावसाळ्यामुळे कामाच्या गतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भौगोलिक रचना ठरते धोकादायक
आंबेनळी घाट हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत कठीण आणि धोकादायक मानला जातो. तीव्र उतार, नागमोडी वळणे आणि अनेक ब्लाइंड टर्नमुळे वाहनचालकांना समोरून येणारी वाहने शेवटच्या क्षणापर्यंत दिसत नाहीत. पावसाळ्यात दाट धुके आणि निसरडे रस्ते यामुळे अपघातांचा धोका अधिक वाढतो.
२०१८ मधील भीषण बस दुर्घटना अजूनही ताजी
२८ जुलै २०१८ रोजी दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस आंबेनळी घाटात खोल दरीत कोसळली होती. या भीषण दुर्घटनेत ३३ जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर घाटातील सुरक्षाव्यवस्थेबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. मात्र त्यानंतरही अपघातांची मालिका सुरूच राहिल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिक नागरिक आणि प्रवासी आता घाटातील कामे युद्धपातळीवर पूर्ण करून सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची मागणी करत आहेत.