PCMCचा कडक इशारा : शहर विद्रूप करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार.

पिंपरी : २७ मे २०२६:पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील बेकायदेशीर पोस्टर्स, फ्लेक्स, पत्रके आणि जाहिरात फलकांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. बसथांबे, भिंती, उद्याने, शाळा, सरकारी कार्यालये, विद्युत रोहित्रे आणि झाडांवर जाहिराती चिकटवून शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर आता थेट दंडात्मक आणि फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
महापालिका आयुक्त Dr. Vijay Suryawanshi यांनी शहरातील वाढत्या अवैध जाहिरातींबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. वादळी वारे आणि अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर दुर्घटना टाळण्यासाठी १५ मे ते १ जून २०२६ या कालावधीत मोठ्या जाहिरात फलकांवर जाहिरात लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीही अनेक ठिकाणी लहान पोस्टर्स आणि फ्लेक्स लावले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना विशेष सूचना दिल्या असून, अतिक्रमण पथके आणि स्थापत्य विभागाच्या सहाय्याने अवैध जाहिराती हटवून संबंधित व्यक्ती व संस्थांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कारवाईत हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.
शहर सुशोभीकरणासाठी प्रशासनाने आणखी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. प्रमुख रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये सुशोभित झाडे लावणे, नियमित छाटणी करणे, चौक आकर्षक पद्धतीने सजवणे आणि स्वच्छता राखणे यावर भर देण्यात आला आहे. शहर सौंदर्यीकरणासाठी सामाजिक संस्था आणि खासगी कंपन्यांचे सहकार्य घेण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
महापालिकेचे उपायुक्त Rajesh Agale यांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणे विद्रूप न करण्याचे आवाहन केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.