आंबेनळी घाटात भीषण स्कॉर्पिओ दुर्घटना : 1500 फूट दरीत कोसळून 8 मित्रांचा मृत्यू; दुर्बिणीच्या सहाय्याने सुरू रेस्क्यू ऑपरेशन.

रायगड:रायगड जिल्ह्यातील महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील धोकादायक आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. कोकणातून साताऱ्याकडे परतणाऱ्या आठ मित्रांच्या स्कॉर्पिओ गाडीला मध्यरात्री भीषण अपघात झाला आणि वाहन तब्बल 1500 फूट खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत सर्व 8 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
पहाटे 2:45 वाजता घडला भीषण अपघात
प्राथमिक माहितीनुसार, रविवार आणि सोमवारी पहाटे सुमारे 2:45 वाजण्याच्या सुमारास दाबेली गावाजवळ हा अपघात घडला. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील हे तरुण कोकणात फिरण्यासाठी गेले होते. सफर आटोपून परतत असताना आंबेनळी घाटातील तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि स्कॉर्पिओ थेट खोल दरीत कोसळली.
अपघात इतका भीषण होता की वाहन दरीत अनेक ठिकाणी आदळत खाली गेले. त्यामुळे मृतदेह दरीत वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले.
दुर्बिणींच्या सहाय्याने सुरू शोधमोहीम
घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, स्थानिक प्रशासन आणि विविध बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरी अत्यंत खोल आणि दुर्गम असल्याने बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत. मृतदेहांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून दुर्बिणींचा वापर करण्यात येत आहे.
या बचाव मोहिमेत महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड बचाव पथक, सिस्केप महाड, आपदा मित्र संस्था तसेच स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. तसेच National Disaster Response Force (NDRF) ची मदतही घेण्यात आली आहे.
आतापर्यंत काही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरित मृतदेह शोधण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे. मृतदेह पोलादपूर येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.
2018 च्या बस दुर्घटनेच्या आठवणी ताज्या
हीच ती जागा आहे जिथे 2018 मध्ये दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. त्या अपघातातही अनेकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आंबेनळी घाट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मृतांची नावे समोर या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणांची नावे पुढीलप्रमाणे
महेश अनिल पवार (वय 25)
आदित्य अशोक साळुंखे (वय 21)
रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25)
सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20)
अंश समीर चव्हाण (वय 18)
उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21)
अनिल अभिमन्यू शिंगटे (वय 25)
नितीन किसन नायकोंडे (वय 35)
मृतांपैकी सात जण सातारा जिल्ह्यातील असून एक जण रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला शोक
मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. “ही घटना अतिशय दुःखद असून मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात राज्य सरकार सहभागी आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून प्रत्येकी सात सदस्यांची पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. रायगड आणि सातारा पोलीस प्रशासन समन्वयाने काम करत असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.