Home Breaking News महाराष्ट्राचा अभिमान! राज्यातील ५ खासदारांना ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर.

महाराष्ट्राचा अभिमान! राज्यातील ५ खासदारांना ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर.

35
0

महाराष्ट्राचा अभिमान! राज्यातील ५ खासदारांना ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर.

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकीय आणि संसदीय क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. राज्यातील पाच खासदारांची प्रतिष्ठेच्या ‘संसद रत्न २०२६’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. संसदेतील उत्कृष्ट कामगिरी, अभ्यासपूर्ण भाषणे, प्रभावी उपस्थिती, प्रश्नोत्तरांमधील सक्रिय सहभाग आणि विविध विषयांवरील मांडणीच्या जोरावर या खासदारांनी देशपातळीवर आपली छाप उमटवली आहे.

विशेष म्हणजे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना सलग दुसऱ्या वर्षी ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सलग दुसऱ्या वर्षी गौरव

ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आपल्या पहिल्याच खासदारकीच्या कार्यकाळात संसदेतील सक्रिय सहभागामुळे राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली. विविध मंत्रालयांना प्रश्न विचारणे, अर्थसंकल्पावर अभ्यासपूर्ण मते मांडणे, जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे आणि संसदेतील उत्कृष्ट उपस्थिती यामुळे त्यांना पुन्हा एकदा या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी संसदेत केलेल्या धडाकेबाज भाषणांमुळे आणि विविध मुद्द्यांवरील प्रभावी मांडणीमुळे विशेष लक्ष वेधले आहे. विरोधकांना थेट प्रत्युत्तर देण्याच्या त्यांच्या शैलीची संसदीय वर्तुळात चर्चा होत असते. सलग दुसऱ्या वर्षी त्यांची या पुरस्कारासाठी निवड होणे हे त्यांच्या संसदीय कामगिरीचे मोठे यश मानले जात आहे.

जुलैमध्ये नवी दिल्लीत होणार पुरस्कार सोहळा

‘संसद रत्न पुरस्कारांचा’ १६ वा सोहळा जुलै २०२६ मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणार आहे. यंदा १५० वा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती पुरस्कार समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शनी राहुलयांनी दिली.

त्यांनी सांगितले की, “यावर्षी १० लोकसभा खासदार, २ राज्यसभा खासदार आणि ४ संसदीय स्थायी समित्यांची निवड करण्यात आली आहे. संसदेतील कामगिरीच्या अधिकृत आकडेवारीच्या आधारे हा सन्मान दिला जातो.”

महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते खासदार

यंदाच्या संसद रत्न पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून खालील खासदारांची निवड करण्यात आली आहे :

नरेश म्हस्के

श्रीकांत शिंदे

हेमंत सावरा

स्मिता वाघ

मेधा कुलकर्णी

याशिवाय उत्तर प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि गुजरातमधील काही खासदारांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे.

‘संसद रत्न’ पुरस्काराची खासियत काय?

चेन्नईस्थित  प्राइम पॉइंट फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेकडून २०१० पासून संसद रत्न पुरस्कार दिले जातात. माजी राष्ट्रपती ए .पी .जे अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार या पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती. पहिल्या पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन स्वतः डॉ. कलाम यांच्या हस्ते झाले होते.

पुरस्कारासाठी निवड करताना संसदेतील अधिकृत आकडेवारी,पीआरएस विधान संशोधन , लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयातील माहितीचा आधार घेतला जातो. परीक्षक समितीत माजी संसदीय अधिकारी, निवृत्त घटनातज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञांचा समावेश असतो. त्यामुळे हा पुरस्कार संसदीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा आणि विश्वासार्ह सन्मान मानला जातो.

महाराष्ट्राची संसदीय ताकद पुन्हा अधोरेखित

राज्यातील खासदारांनी संसदेतील प्रभावी कामगिरीच्या जोरावर पुन्हा एकदा महाराष्ट्राचा आवाज देशाच्या संसदेत बुलंद केला आहे. ‘संसद रत्न’ पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेचा गौरव अधिक उंचावला असून, राज्यातील जनतेसाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.