पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी — “तुमचं आणि आमचं… भाजप सर्वांचाच आहे!” या ठाम संदेशासह पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात आज महत्त्वाची घडामोड घडली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका विनयताई टापकीर आणि समाजसेवक श्री. प्रदीप आबा टापकीर यांनी भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृत प्रवेश केला. विकासाभिमुख हिंदुत्वाच्या विचारधारेवर विश्वास ठेवत त्यांनी भाजप परिवारात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रवेशप्रसंगी विधानपरिषदेचे आमदार श्री. अमित गोरखे, माजी उपमहापौर श्री. प्रभाकर वाघेरे, तसेच माजी नगरसेवक श्री. उल्हास शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना नेत्यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या “मजबूत भारत आणि विकसित महाराष्ट्र” या संकल्पनेतून प्रेरित होऊन आज अनेक मान्यवर भाजपमध्ये सहभागी होत आहेत. विकास, सुशासन, पारदर्शकता आणि लोकहित हे भाजपचे प्रमुख मूल्य असून, त्याच विचारांशी सहमत होऊन विनयताई टापकीर व प्रदीप आबा टापकीर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत आणि सर्वांगीण विकासासाठी आता सर्वांनी एकत्र काम करण्याची शपथ यावेळी घेण्यात आली. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी संधी आणि सामाजिक बांधिलकी या मुद्द्यांवर भाजप अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
विकासाभिमुख हिंदुत्व ही केवळ संकल्पना नसून ती कृतीतून साकार करण्याचा भाजपचा निर्धार असून, या प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवडमधील भाजपची संघटनात्मक ताकद अधिक वाढणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. एकूणच, “विचार विकासाचा, मार्ग हिंदुत्वाचा” या भूमिकेसह भाजपने पुन्हा एकदा आपला निर्धार अधोरेखित केला आहे.