लोणावळ्यातील सुप्रसिद्ध कैवल्यधाम योग संस्था शतकपूर्तीनिमित्त विविध उपक्रम राबवत असून, याचाच एक भाग म्हणून संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री. सुबोध तिवारी यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील संसद भवनात भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांची विशेष भेट घेतली.
या भेटीच्या वेळी श्री. सुबोध तिवारी यांनी पंतप्रधानांना “कैवल्यधाम कॉफी टेबल बुक” सप्रेम भेट देत शतकपूर्ती सोहळ्याचे स्मरणरूप सन्मानचिन्ह अर्पण केले. या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री व कैवल्यधाम शताब्दी वर्ष समितीचे अध्यक्ष श्री. सुरेश प्रभू हे देखील उपस्थित होते.
संसदीय कामकाजाच्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून पंतप्रधानांनी कैवल्यधाम प्रतिनिधींशी संवाद साधला. याबद्दल श्री. सुरेश प्रभूंनी कृतज्ञता व्यक्त करताना, “कैवल्यधाम शताब्दी समितीचा अध्यक्ष होण्याचा मला अभिमान आहे,” असे गौरवोद्गार काढले.
यावेळी श्री.सुबोध तिवारी यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन यांचीही भेट घेऊन, त्यांना उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएने उमेदवारी दिल्याबद्दल अभिनंदन केले व हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी राज्यपालांच्या दीर्घ अनुभवामुळे आणि शासकीय आकलनामुळे ते उत्कृष्ट उपराष्ट्रपती ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कैवल्यधाम प्रतिनिधींशी खास भेट; कॉफी टेबल बुकचे सप्रेम प्रकाशन”