Home Breaking News पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! भिडे पूल वाहतुकीसाठी तात्पुरता खुला — दिवाळी गर्दी टाळण्यासाठी...

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! भिडे पूल वाहतुकीसाठी तात्पुरता खुला — दिवाळी गर्दी टाळण्यासाठी वाहतूक विभागाचा महत्त्वाचा निर्णय

53
0
पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पुणेकरांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक महिन्यांपासून बंद असलेला भिडे पूल अखेर वाहतुकीसाठी पुन्हा एकदा खुला करण्यात येणार आहे. सदाशिव पेठेला डेक्कन मेट्रो स्थानकाशी जोडणारा हा पूल शहरातील महत्त्वाचा दुवा असल्याने नागरिकांकडून तो सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात होती.
वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिडे पूलवरील वाहतूक ११ ऑक्टोबरपासून पुढील आदेश येईपर्यंत दररोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत खुली राहणार आहे. दिवाळी सणानिमित्त शहरात होणारी गर्दी आणि मध्यवर्ती भागातील वाढलेली वाहतूक टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील व्यापारी, कामगार आणि प्रवासी वर्गाला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः शनिवारवाडा, देccan, FC रोड, आणि लक्ष्मी रोड परिसरातील वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.
भिडे पूल हा पुणेकरांसाठी भावनिक आणि वाहतूकदृष्ट्या दोन्ही दृष्टीने महत्त्वाचा दुवा आहे. काही महिन्यांपूर्वी दुरुस्ती आणि सुरक्षा कारणास्तव तो बंद करण्यात आला होता. त्यानंतर नागरिक मंच आणि स्थानिक संघटनांकडून हा पूल पुन्हा सुरू करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती.
वाहतूक विभागाचे पोलिस उपआयुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितले की, “हा निर्णय तात्पुरता असून, नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. पुढील आदेश येईपर्यंत सध्याची वाहतूक व्यवस्था कायम राहील.”
भिडे पूल खुला झाल्याने दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेला थोडा श्वास मिळेल अशी अपेक्षा आहे.