Home Breaking News पुण्यात दहीहंडी उत्सवाला गालबोट; DJ सेटअप अंगावर पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू.

पुण्यात दहीहंडी उत्सवाला गालबोट; DJ सेटअप अंगावर पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू.

19
0

पुण्यात दहीहंडी उत्सवाला गालबोट; DJ सेटअप अंगावर पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू.

 पुणे  | ५ सप्टेंबर २०२६ :

दहीहंडी उत्सवाच्या आनंदाला पुण्यातील जुन्या सांगवी परिसरात गालबोट लागले. दहीहंडी कार्यक्रमानंतर DJ सेटअपचे लोखंडी स्ट्रक्चर काढताना अवजड भाग अचानक कोसळून सलमा सलाउद्दीन पठाण (वय ४५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा संपूर्ण थरारक प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

शुक्रवारी रात्री सुमारे १० वाजून २१ मिनिटांनी विघ्नहर्ता दहीहंडी मंडळाच्या कार्यक्रमानंतर हा अपघात घडला. कार्यक्रम संपल्यानंतर DJ साठी उभारण्यात आलेले लोखंडी सांगाडे काढण्याचे काम सुरू होते.

अचानक या स्ट्रक्चरचा अवजड भाग कोसळला. स्ट्रक्चर पडताना उपस्थित नागरिकांनी स्वतःला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र DJ कडे पाठ करून उभ्या असलेल्या सलमा पठाण यांना परिस्थितीची कल्पना आली नाही.

काही क्षणांतच लोखंडी स्ट्रक्चर त्यांच्या अंगावर कोसळले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. मात्र त्यांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची आणखी वेदनादायी बाब म्हणजे सलमा पठाण यांचा मुलगा याच दहीहंडी मंडळाशी संबंधित असून तो मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पठाण कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

मुलाचा मंडळातील सहभाग लक्षात घेता पठाण कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती आहे. मात्र घटना गंभीर असल्याने पोलिसांनी स्वतःहून दखल घेत आवश्यक कारवाई सुरू केली आहे.

दरम्यान, दहीहंडी उत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मोठ्या लोखंडी संरचना आणि DJ सेटअपच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे. उत्सवाच्या काही तासांनंतर घडलेल्या या दुर्घटनेमुळे जुन्या सांगवी परिसरातील आनंदाचे वातावरण शोकाकुल झाले.

CCTV मध्ये कैद झालेल्या या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला असून, काही क्षणांत घडलेला हा अपघात पाहून अंगावर काटा येतो.