मुंबई | मनोरंजन वृत्त — पंजाबच्या फिल्लौर तहसीलमधील दोसांझ कलां या छोट्याशा गावातून निघालेला एक साधा शीख तरुण आज जागतिक स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल करत आहे. दिलजीत दोसांझ यांची कहाणी ही संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वासाची जिवंत उदाहरण ठरत आहे. आज वयाच्या ४२व्या वर्षीही दिलजीत ‘दिल लुमिनाटी टूर’मुळे चर्चेत आहेत, मात्र याच टूरदरम्यान काही वादांनीही डोके वर काढले आहे.
संघर्षमय बालपण, मर्यादित शिक्षण
दिलजीत यांचा जन्म एका सामान्य शीख कुटुंबात झाला. बालपण आर्थिक अडचणींमध्ये गेल्याने ते केवळ दहावीपर्यंतच शिक्षण घेऊ शकले. मात्र, लहानपणापासूनच संगीताची ओढ होती. गुरुद्वारात गुरबाणी कीर्तन करत त्यांनी आपल्या आवाजाला धार दिली. हीच साधी सुरुवात पुढे त्यांच्या आयुष्याची दिशा बदलणारी ठरली.
स्टेज शो, लग्न समारंभ ते स्टारडम
करिअरच्या सुरुवातीला दिलजीत यांनी स्टेज शो, गावातील कार्यक्रम आणि अगदी लग्नसमारंभातही गाणी गायली. पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीत त्यांनी पाऊल टाकलं, मात्र सुरुवातीला अपेक्षित यश मिळालं नाही. अनेक अपयश, नकार आणि टीकेनंतरही त्यांनी हार मानली नाही. हळूहळू त्यांची गाणी लोकप्रिय झाली आणि पंजाबी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आपलं स्थान निर्माण केलं.
‘पगडीवाला हिरो नाही होऊ शकत’ ही मानसिकता
पंजाबी सिनेसृष्टीत यश मिळाल्यानंतर जेव्हा दिलजीतने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला, तेव्हा अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. “पगडीवाले लोक बॉलिवूडमध्ये हिरो बनू शकत नाहीत,” असे टोमणे त्यांना ऐकावे लागले. मात्र दिलजीत यांनी आपल्या अभिनय, व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ही मानसिकताच मोडून काढली.
बॉलिवूडपासून ग्लोबल स्टारपर्यंत
आज दिलजीत केवळ बॉलिवूडपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर, मोठ्या कॉन्सर्ट्समध्ये आणि ग्लोबल टूरमध्ये ते भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत. शीख ओळख, पगडी आणि पंजाबी संस्कृतीला त्यांनी अभिमानाने जागतिक स्तरावर नेलं.
दिल लुमिनाटी टूर आणि वाद
सध्या ‘दिल लुमिनाटी टूर’मुळे दिलजीत चर्चेत आहेत. या टूरदरम्यान एका पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर काम केल्याने त्यांच्यावर काहींनी थेट देशद्रोहाचे आरोप केले. मात्र समर्थकांचे म्हणणे आहे की, कला आणि कलाकाराला सीमांमध्ये बांधणे योग्य नाही, आणि दिलजीत यांची ओळख ही संगीत आणि संस्कृतीशी आहे, राजकारणाशी नाही.
प्रेरणादायी प्रवास
दिलजीत दोसांझ यांचा प्रवास हा केवळ यशाचा नाही, तर ओळख जपून, अपमान सहन करत, स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा प्रवास आहे. त्यांनी सिद्ध केलं की, पगडी ही मर्यादा नाही, तर अभिमानाचं प्रतीक आहे.