पुणे : नवीन वाहन खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक आणि आधुनिक सुविधा म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक (फॅन्सी नंबर) आरक्षित करण्याची फेसलेस म्हणजेच पूर्णतः ऑनलाईन सेवा ६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजल्यापासून सुरू होणार आहे.
ही सेवा डिजिटल इंडिया उपक्रमाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असून नागरिकांना आरटीओ कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची गरज भासणार नाही. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, सोपी आणि ऑनलाइन स्वरूपात राबवली जाणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
या नव्या व्यवस्थेनुसार, कार्यालयात कोणतेही ऑफलाईन शुल्क स्वीकारले जाणार नाही. नागरिकांनी फक्त अधिकृत संकेतस्थळ https://fancy.parivahan.gov.in यावरूनच अर्ज करावा लागणार आहे. आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपीद्वारे पडताळणी करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
विशेष म्हणजे, नव्याने सुरू होणाऱ्या ‘एमएच झेडसी (MH ZC)’ मालिकेतील आकर्षक आणि पसंतीचे नोंदणी क्रमांक या सेवेमार्फत आरक्षित करता येणार आहेत. त्यामुळे चार आकडी, एकसमान किंवा विशेष क्रमांक मिळवू इच्छिणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
या फेसलेस सेवेच्या माध्यमातून वेळेची बचत, गैरसोय टाळणे, मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी करणे आणि नागरिकांना सुलभ सेवा देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. पुणे आरटीओकडून सुरू होणारी ही सुविधा भविष्यात इतर सेवांसाठीही मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.