उत्तर भारतात सध्या भीषण शीतलहर आणि दाट कोहऱ्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये थंडीचा तीव्र फटका बसत असून, कोहऱ्यामुळे दृश्यमानता अत्यंत कमी झाली आहे. याचा थेट परिणाम हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर दिसून येत आहे.
दिल्ली विमानतळावर कोहऱ्यामुळे अनेक फ्लाइट्स रद्द तर अनेक उड्डाणांना मोठा विलंब होत आहे. प्रवाशांचे हाल होत असून, विमानतळावर लांबच लांब रांगा आणि प्रतीक्षा वाढली आहे. दुसरीकडे, उत्तर भारतातून जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या २ ते ६ तास उशिराने धावत आहेत, काही गाड्या तर वेळापत्रकातूनच वगळण्यात आल्या आहेत.
रस्त्यांवरील परिस्थितीही गंभीर असून, हायवेवर वाहनांची गती अत्यंत मंदावली आहे. कोहऱ्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असल्याने पोलिस व प्रशासनाकडून वाहनचालकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या असून, काही राज्यांत इयत्ता प्राथमिक शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नववर्षाच्या सुरुवातीचे काही दिवस उत्तर भारतासाठी आणखी कठीण ठरू शकतात. दाट कोहरा आणि शीतलहर कायम राहण्याची शक्यता असून, रात्री आणि पहाटे तापमान आणखी घसरण्याचा अंदाज आहे. काही भागांत पावसाची किंवा हलक्या हिमवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे थंडीचा प्रभाव अधिक वाढू शकतो.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचा, उबदार कपडे वापरण्याचा आणि ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. नववर्षाचे स्वागत थंडी आणि कोहऱ्याच्या सावलीतच करावे लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.