भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारताने हिमालयीन सीमाभागात भक्कम पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला असून, चीनला ठोस आणि प्रभावी उत्तर देण्याची तयारी सुरू असल्याचा दावा एका अमेरिकी अहवालात करण्यात आला आहे. या अहवालानुसार, भारताने सीमेलगतच्या दुर्गम भागांमध्ये रस्ते, बोगदे (सुरंग) आणि एअरस्ट्रीप्सचे जाळे वेगाने उभारण्यास सुरुवात केली आहे.
विशेषतः लडाख, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीम या सीमावर्ती राज्यांमध्ये सामरिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम सुरू आहे. खराब हवामान आणि अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती असूनही भारतीय यंत्रणा दिवस-रात्र काम करत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे सेनादलांची जलद हालचाल, शस्त्रसाठ्याचा पुरवठा आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देणे शक्य होणार आहे.
अमेरिकी अहवालानुसार, चीनने गेल्या काही वर्षांत सीमाभागात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या असून, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतही आता कोणतीही कसर सोडत नसल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. नव्या एअरस्ट्रीप्समुळे लष्करी विमानांची लँडिंग क्षमता वाढणार असून, हवाई दलाची ताकद आणखी मजबूत होणार आहे.
संरक्षण तज्ज्ञांच्या मते, ही पायाभूत कामे केवळ संरक्षणापुरती मर्यादित नसून सीमावर्ती भागातील स्थानिक नागरिकांच्या विकासालाही चालना देणारी आहेत. रस्ते आणि बोगद्यांमुळे दळणवळण सुलभ होणार असून, पर्यटन, आरोग्य आणि आपत्कालीन सेवा अधिक प्रभावी ठरणार आहेत.
दरम्यान, भारत सरकारकडून या प्रकल्पांबाबत अधिकृत मौन पाळण्यात आले असले तरी हिमालयात सुरू असलेली हालचाल भारताच्या रणनीतिक दृढतेचा आणि आत्मविश्वासाचा स्पष्ट संदेश देणारी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.