मुंबई | १९ डिसेंबर – महाराष्ट्राचे माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून, लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. सीटी अँजिओग्राफी तपासणीत त्यांच्या हृदयाकडे जाणाऱ्या चार प्रमुख रक्तवाहिन्यांमध्ये गंभीर ब्लॉकेज आढळून आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील बांद्रा पश्चिम येथील लिलावती रुग्णालयात माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुरेश विजयन यांनी शुक्रवारी सायंकाळी माध्यमांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर माहिती दिली.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी दुपारी सुमारे २.१५ वाजता माणिकराव कोकाटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल होताना त्यांना छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास, डोक्यात जडपणा जाणवणे अशा तक्रारी होत्या. त्याचबरोबर त्यांच्या हृदयाचे ठोके प्रति मिनिट ११५ पर्यंत वाढलेले असल्याचे निदर्शनास आले.
तत्काळ प्राथमिक आणि सखोल तपासण्या केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या सीटी अँजिओग्राफीमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या चार धमन्यांमध्ये अडथळे असल्याचे स्पष्ट झाले.
डॉक्टरांनी सांगितले की, ब्लॉकेजचे प्रमाण लक्षात घेता बायपास शस्त्रक्रिया हा अधिक सुरक्षित आणि परिणामकारक पर्याय असल्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, रुग्णाने शस्त्रक्रिया टाळण्याचा निर्णय घेतल्यास अँजिओप्लास्टी हा पर्याय देखील उपलब्ध असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, माणिकराव कोकाटे यांना सुमारे १५ वर्षांपूर्वी दोन स्टेंट बसवण्यात आले होते, आणि ते सध्या व्यवस्थित कार्यरत असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या सतत निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीबाबत राजकीय, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातून चिंता व्यक्त केली जात असून, त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.