सुलतानपूर (उत्तर प्रदेश) : गृहमंत्री Amit Shah यांच्यावरील कथित टिप्पणीप्रकरणी काँग्रेस नेते Rahul Gandhi शुक्रवारी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील MP/MLA न्यायालयात हजर झाले. सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत हा खटला राजकीय द्वेषातून दाखल करण्यात आल्याचा दावा केला.
राहुल गांधी यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात कोणताही ठोस पुरावा नसून राजकीय हेतूने कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयात हजेरी लावताना राहुल गांधी यांनी न्यायाधीशांना हात जोडून नमस्कार केला. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी न्यायालयाचे आभारही मानले.
सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी राहुल गांधी यांना विचारले की, “आपल्याला काही स्पष्टीकरण द्यायचे आहे का?” यावर राहुल गांधी यांनी “होय” असे उत्तर देत आपली बाजू मांडण्याची तयारी दर्शवली. सुमारे २० मिनिटे ते न्यायालयात उपस्थित होते. पुढील सुनावणी ९ मार्च रोजी निश्चित करण्यात आली आहे.
न्यायालयीन कामकाजानंतर राहुल गांधी यांनी सुलतानपूरमधील रामचेत मोची यांच्या दुकानाला भेट दिली. त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. रामचेत मोची यांच्या नात श्रद्धाला त्यांनी प्रेमाने उचलून घेतले. तिच्या पायाला झालेली दुखापत पाहून त्यांनी विचारपूस केली आणि तिच्या प्रकृतीची माहिती घेतली.
या भेटीदरम्यान स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. राहुल गांधी यांनी सामान्य नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. राजकीय घडामोडींमध्ये सुरू असलेल्या या प्रकरणामुळे आगामी काळात राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.