पिंपरी-चिंचवडमध्ये मालमत्ता कराची विक्रमी वसुली; सहा महिन्यांत ६१० कोटींचा कर जमा
पिंपरी, दि. १ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत विक्रमी मालमत्ता कर वसुली केली आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच सहा महिन्यांत तब्बल ६१० कोटी ४४ लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे. शहरातील ७ लाख ६६ हजार नोंदणीकृत मालमत्ता धारकांपैकी ५ लाख ९ हजार २०० नागरिकांनी म्हणजेच ६६.४७ टक्के नागरिकांनी कराचा भरणा केला आहे.
महापालिकेने कर वसुलीसाठी विविध सवलती, जनजागृती मोहीम, नोटीस बजावणे, थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध करणे, जप्ती मोहीम, महिला बचत गटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप, रिक्षाद्वारे जनजागृती आणि एसएमएसद्वारे कर व सवलतीची माहिती देणे अशा उपाययोजना राबवल्या. त्यामुळे कर भरणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
ऑनलाइन कर भरण्याला नागरिकांची पसंती मिळत असून, पहिल्या सहामाहीत सुमारे ४ लाख ४५ हजार मालमत्ता धारकांनी ऑनलाइन पद्धतीने ४७१ कोटी ८३ लाख रुपयांचा कर भरला आहे. घरबसल्या कर भरण्याची सुविधा उपलब्ध असल्याने ऑनलाइन माध्यमाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
महापालिकेच्या १८ करसंकलन विभागीय कार्यालयांमध्ये वाकड झोनने सर्वाधिक ८४ कोटी ९१ लाख रुपयांची वसुली केली. त्यानंतर थेरगाव ५३ कोटी १५ लाख, कस्पटे वस्ती ४५ कोटी १९ लाख, किवळे ४४ कोटी ९१ लाख, पिंपरी नगर ४४ कोटी ९९ लाख आणि चिखली ४४ कोटी ६१ लाख रुपयांची वसुली झाली. तळवडे कार्यालयाची वसुली ११ कोटी ९९ लाख रुपये झाली.
गतवर्षी सप्टेंबरअखेर ४ लाख ७८ हजार २६८ मालमत्ता धारकांनी ६०३ कोटी ८२ लाख रुपयांचा कर भरला होता. यंदा ६१० कोटी ४४ लाख रुपयांची वसुली झाल्याने गतवर्षाच्या तुलनेत ६ कोटी ६२ लाख रुपयांची वाढ झाली आहे.
मागील चार वर्षांतील सहामाही मालमत्ता कर वसुलीमध्येही चढता-उतार दिसून येतो. २०२३-२४ मध्ये ५९० कोटी ६० लाख, २०२४-२५ मध्ये ५१२ कोटी ६२ लाख, २०२५-२६ मध्ये ६०३ कोटी ८२ लाख, तर २०२६-२७ मध्ये आतापर्यंत ६१० कोटी ४४ लाख रुपयांची वसुली झाली आहे.
कर भरणाऱ्यांमध्ये निवासी मालमत्ता धारकांची संख्या सर्वाधिक असून ४ लाख ५१ हजार ७३९ निवासी मालमत्ता धारकांनी कर भरला आहे. याशिवाय ४० हजार १९७ बिगरनिवासी, १० हजार ४४ मिश्र, ३ हजार ६६७ औद्योगिक आणि ३ हजार ४८९ मोकळ्या जमीन मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मालमत्ता कर हा महापालिकेच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत असल्याचे सांगून कर भरून शहर विकासात योगदान देणाऱ्या नागरिकांचे आभार मानले. पुढील काळात थकबाकीदार मालमत्तांकडून कर वसुलीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उर्वरित ३३.५२ टक्के मालमत्ता धारकांकडून कर वसुली करण्यासाठी पुढील सहा महिन्यांत विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. अनेक वर्षांपासून थकीत असलेला कर आणि चालू कराची १०० टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट असल्याचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

