Home Breaking News हनुमान अंश’च्या शोवरून बवाल? मुंबईतील गेयटी गॅलेक्सी थिएटरला पोलिसांचा टाळा; बंद होण्यामागे...

हनुमान अंश’च्या शोवरून बवाल? मुंबईतील गेयटी गॅलेक्सी थिएटरला पोलिसांचा टाळा; बंद होण्यामागे वेगळेच कारण.

24
0

हनुमान अंश’च्या शोवरून बवाल? मुंबईतील गेयटी गॅलेक्सी थिएटरला पोलिसांचा टाळा; बंद होण्यामागे वेगळेच कारण.

 

लायसन्स २०२१-२२ पासून नूतनीकरण झाले नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर; लायसन्स मिळताच थिएटर पुन्हा सुरू होणार

मुंबई | ८ सप्टेंबर २०२६ :

मुंबईतील वांद्रे परिसरातील प्रसिद्ध गेयटी गॅलेक्सी थिएटर बंद करण्यात आल्याने सध्या चर्चेला उधाण आले आहे. ‘हनुमान अंश’ या चित्रपटाचा शो हटवल्यामुळे काही लोकांनी थिएटरमध्ये गोंधळ घातल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, पोलिसांच्या तपासानंतर थिएटर बंद होण्यामागील वेगळेच कारण समोर आले आहे.

‘हनुमान अंश’चा शो न दाखवल्याच्या कारणावरून काही जणांनी थिएटरमध्ये विरोध केल्याचे सांगितले जात आहे. यावेळी थिएटर परिसरातील ‘मिर्झापूर: द मूव्ही’चे पोस्टर फाडण्यात आल्याची माहितीही समोर आली.

या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी गेयटी गॅलेक्सी थिएटरमध्ये जाऊन पाहणी केली. त्यावेळी थिएटरचे लायसन्स २०२१-२२ पासून नूतनीकरण झालेले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नियमांनुसार थिएटरचे कामकाज बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी थिएटरवर बंद ठेवण्याबाबत नोटीसही लावली आहे. मात्र, लायसन्सचे नूतनीकरण झाल्यानंतर थिएटर पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

गेयटी गॅलेक्सी आणि मराठा मंदिर या दोन्ही थिएटरचे व्यवस्थापन एकाच संस्थेकडे आहे. मराठा मंदिरच्या व्यवस्थापनानेही लायसन्सशी संबंधित काही अंतर्गत बाबींमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट केले असून, त्या लवकरात लवकर सोडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

दरम्यान, सोशल मीडियावर थिएटरमध्ये केबल जळाल्यामुळे थिएटर बंद करण्यात आल्याचा दावा केला जात होता. तसेच ‘हनुमान अंश’च्या स्क्रीनिंगदरम्यान झालेल्या गोंधळामुळेच थिएटरवर कारवाई झाल्याचीही चर्चा होती.

मात्र, व्यवस्थापनाने या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. लायसन्सशी संबंधित अंतर्गत समस्या सोडवण्याचे काम सुरू असून, लवकरच थिएटरमध्ये पुन्हा शो सुरू होतील, असे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

दरम्यान, नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिना उलटूनही अनेक ठिकाणी शो हाऊसफुल्ल होत असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटातील भजने, कथा आणि साधेपणाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.