साखरेच्या दरवाढीला इथेनॉल निर्मितीचा फटका; सणासुदीत गोड पदार्थ महागण्याची शक्यता.

पुणे, २१ ऑगस्ट २०२६ : देशात साखरेच्या उत्पादनात अपेक्षित वाढ न झाल्याने साखरेच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसांत किरकोळ साखरेचा दर वाढून सुमारे ७२ रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. त्यामुळे आगामी सणासुदीत मिठाई, पेढे, लाडू आणि अन्य गोड पदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.
माजी साखर आयुक्त आणि आयएएस अधिकारी शेखर गायकवाड यांच्या मते, इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देण्यात आल्याने अनेक साखर कारखान्यांनी साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीकडे अधिक लक्ष दिले. परिणामी गेल्या काही वर्षांत साखरेच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
देशाला दरवर्षी सुमारे २८० लाख मेट्रिक टन साखरेची गरज असते. गेल्या वर्षी २५८ लाख टन उत्पादन झाले होते, तर यंदा उत्पादन सुमारे २७६ लाख टनांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, हे उत्पादन देशाच्या वार्षिक गरजेपेक्षा कमी आहे. ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नव्या गळीत हंगामात उत्पादन किती राहील, याबाबत अद्याप स्पष्ट अंदाज उपलब्ध नाही.
हवामानातील बदल आणि एल निनोच्या परिणामामुळे आगामी हंगामात साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे देशांतर्गत मागणी आणि पुरवठ्यातील तफावत कायम राहिल्यास साखरेचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे तब्बल दहा वर्षांनंतर भारताला साखर आयात करण्याची वेळ येण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.


