Home Breaking News HSRP नंबर प्लेट नाही? आता रस्त्यावरच होणार तपासणी; परिवहन विभागाची विशेष पथके...

HSRP नंबर प्लेट नाही? आता रस्त्यावरच होणार तपासणी; परिवहन विभागाची विशेष पथके सक्रिय.

54
0

HSRP नंबर प्लेट नाही? आता रस्त्यावरच होणार तपासणी; परिवहन विभागाची विशेष पथके सक्रिय.

मुंबई : १३ ऑगस्ट : वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) न बसवणाऱ्या वाहनधारकांविरोधात परिवहन विभागाने आता कडक कारवाईची तयारी सुरू केली आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही मोठ्या संख्येने वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसवण्यात आलेली नसल्याने विभागाकडून विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

परिवहन विभागाच्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत १ कोटी १० लाख ८४ हजार वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी ९८ लाख ८ हजार वाहनांवर HSRP प्लेट बसवण्यात आली आहे. मात्र, अद्याप मोठ्या संख्येने वाहनांवर HSRP प्लेट बसवण्यात आलेली नाही.

रस्त्यावर वाहनांची तपासणी

HSRP नियमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने विशेष पथके तयार केली आहेत. या पथकांकडून विविध ठिकाणी वाहनांची तपासणी केली जाणार असून, जुन्या किंवा अनधिकृत नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

HSRP नंबर प्लेट म्हणजे काय?

HSRP ही अॅल्युमिनियमपासून तयार केलेली सुरक्षित नंबर प्लेट आहे. या प्लेटवर अशोकचक्राचा होलोग्राम, लेझर-ब्रँडेड कायमस्वरूपी ओळख क्रमांक, ‘IND’ चिन्ह आणि विशेष हॉट-स्टॅम्प फिल्म असते. वाहनाच्या डिजिटल नोंदणीशी ही प्लेट जोडलेली असल्याने तिचा वापर दुसऱ्या वाहनासाठी करता येत नाही.

चोरी आणि बनावट नंबर प्लेटला आळ

HSRP प्रणालीमुळे वाहनांची ओळख अधिक सुरक्षित होण्यास मदत होते. बनावट नंबर प्लेटचा वापर, वाहन चोरी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचा माग काढणे अधिक सोपे होण्याची अपेक्षा आहे. कॅमेरे आणि डिजिटल प्रणालीच्या मदतीने वाहन क्रमांकाची ओळख पटवणेही सुलभ होते.

त्यामुळे ज्या वाहनधारकांनी अद्याप HSRP नंबर प्लेट बसवलेली नाही, त्यांनी नियमांची माहिती घेऊन लवकरात लवकर प्लेट बसवून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.