Home Breaking News महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय; १० जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज.

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय; १० जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज.

42
0

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय; १० जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज.

महाराष्ट्र, दि. ९ ऑगस्ट २०२६ : राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पुढील पाच दिवस काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज राज्यातील १० जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे.

 ‘या’ १० जिल्ह्यांना आज यलो अलर्ट, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी विजांचा कडकडाट सुरू असताना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत वादळी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जळगाव, नाशिक, अहिल्यानगरसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर तसेच विदर्भातील नागपूर व गोंदिया येथे पावसाच्या सरींची शक्यता आहे.

पुढील पाच दिवसांत विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहून हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानपासून दिल्ली, मध्य प्रदेशमार्गे पश्चिम बंगाल आणि पुढे बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण कायम आहे.

दरम्यान, राज्यातील बहुतांश भागात पावसापासून काही प्रमाणात उघडीप मिळण्याची शक्यता असली, तरी स्थानिक वातावरणामुळे अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. त्यामुळे अलर्ट असलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.