Home Breaking News पंढरपुरात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भव्य भक्तनिवासाचे सुनेत्रा पवार यांच्या हस्ते...

पंढरपुरात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भव्य भक्तनिवासाचे सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण.

29
0

पंढरपुरात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भव्य भक्तनिवासाचे सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण.

पंढरपूर, दि. ४ : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य धर्मशाळा-भक्तनिवासाचे उद्घाटन व लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी गृहमंत्री तथा आमदार दिलीपराव वळसे पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, ह.भ.प. कानोबा महाराज मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी, “वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. ऊन-पावसाची पर्वा न करता पंढरीची वारी करणाऱ्या भाविकांसाठी उभारण्यात आलेले हे भक्तनिवास त्यांच्या सेवेसाठी कायम उपयुक्त ठरेल,” असे सांगितले. मंचरच्या ऐतिहासिक व आध्यात्मिक परंपरेचा उल्लेख करत त्यांनी या वास्तूचे कौतुक केले.

यावेळी त्यांनी पंढरपूरच्या सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची माहिती देत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर, चंद्रभागा घाट, प्रदक्षिणा मार्ग, पालखी तळ, वाहनतळ व अन्य सुविधांचा विकास केला जाणार असल्याचे सांगितले. तसेच वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या साडेपाच हजार बसची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

या कार्यक्रमाला सेवा मंडळाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, पत्रकार तसेच हजारो वारकरी उपस्थित होते. मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या या भक्तनिवासामुळे पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना सुरक्षित, सुसज्ज आणि हक्काचा निवारा उपलब्ध होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.