लडाखमध्ये स्वदेशी पॅराशूट प्रणालीचे मोठे यश; ‘हाय-अल्टीट्यूड पॅराशूट’ने सिद्ध केली आपली क्षमता
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO ने देशाच्या लष्करी पॅराशूट तंत्रज्ञान क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. लडाखमधील न्योमा येथील मुध ड्रॉप झोनमध्ये ‘अॅडव्हान्स्ड हाय-अल्टीट्यूड पॅराशूट’ म्हणजेच AHAP चे पहिले ‘लाइव्ह जंप’ यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. हे लाइव्ह जंप समुद्रसपाटीपासून सुमारे १६ हजार फूट उंचीवरून करण्यात आले, जे हाय-अल्टीट्यूड लष्करी पॅराशूट ऑपरेशन्सच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
या चाचणीदरम्यान पॅराट्रूपर्सनी १६ हजार फूट उंचीवरून उडी मारली. सुमारे १५ हजार ५०० फूट उंचीवर AHAP पॅराशूट उघडण्यात आले. यानंतर पॅराट्रूपर्सनी नियंत्रित पद्धतीने खाली येत सुमारे १३ हजार ७०० फूट उंचीवर असलेल्या न्योमा म्हणजेच मुध ड्रॉप झोनमध्ये यशस्वी लँडिंग केले.
AHAP ही एक ‘स्टॅटिक लाइन पॅराशूट सिस्टीम’ आहे. पॅराट्रूपर्सच्या तुकडीला एकाच वेळी ड्रॉप करण्याच्या गरजा विशेषतः लक्षात घेऊन हे डिझाइन करण्यात आले आहे. या यशस्वी लाइव्ह जंपने हे सिद्ध केले आहे की अत्यंत जास्त उंचीवर आणि आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीतही ही प्रणाली प्रभावीपणे कार्य करू शकते.